HEALTH IS WEALTH : मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी. रक्त शुद्ध करणे, शरीरातील अतिरिक्त पाणी आणि क्षार बाहेर काढणे, रक्तदाब नियंत्रित करणे आणि लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करणे ही किडनीची मुख्य कामे आहेत. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैली, चुकीचे खाणे आणि पाणी न पिण्याच्या सवयींमुळे किडनीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. डॉक्टरांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात किडनीचा आजार समजत नाही, म्हणून प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोजच्या सवयींमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पौष्टिक आहार आणि पुरेसे पाणी पिणे. आहारात कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कमी तेलकट पदार्थांचा समावेश करावा. कारण हे नैसर्गिक अन्न घटक किडनीवर ताण कमी करतात. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत आणि किडनीत स्टोन होण्याचा धोका वाढतो.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरेशी झोप. झोपेची कमतरता असल्यास हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो. या दोन्ही आजारांचा थेट परिणाम किडनीवर होतो. रात्री झोपेच्या वेळी किडनी शरीरातील रक्त अधिक चांगल्या पद्धतीने फिल्टर करतात आणि अतिरिक्त द्रव व कचरा बाहेर टाकतात. त्यामुळे दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे.
तिसरा उपाय म्हणजे वेदनाशामक गोळ्या म्हणजेच पेनकिलर टाळणे. डोकेदुखी, अंगदुखी किंवा किरकोळ वेदनेसाठी अनेकजण सर्रास पेनकिलर घेतात. मात्र या गोळ्यांमुळे किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. आधीच किडनीचा त्रास किंवा डिहायड्रेशन असेल तर पेनकिलरचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
चौथा मुद्दा म्हणजे आहारातील मीठ कमी करणे. शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम किडनी करते. जास्त मीठ खाल्ल्याने किडनींना ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदय व किडनी दोन्हीवर ताण येतो. पॅकेट बंद पदार्थ, चिप्स, लोणचे आणि बाहेरील जेवणात मीठाचे प्रमाण जास्त असते, ते टाळावे.
पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान टाळणे. सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्या खराब होतात आणि किडनीपर्यंत रक्त पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे किडनी कॅन्सरचा धोका देखील वाढतो. त्याचप्रमाणे जास्त मद्यपान केल्याने शरीरात डिहायड्रेशन होते आणि रक्तदाब वाढतो, ज्याचा थेट फटका किडनीला बसतो.
सामान्यतः किडनीचा आजार एकदा झाला की तो पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे वेळीच तपासणी करणे आणि वरील सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. वर्षातून एकदा क्रिएटिनिन आणि युरिन टेस्ट करून घ्यावी. लहानशा बदलांमुळे किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवता येते आणि मोठ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो .