HEALTH IS WEALTH : घरकाम असुद्या किंवा ऑफिसचा ताण; दुर्लक्ष केल्यास शरीरावर होणारे 5 धोकादायक परिणाम - टॉप न्यूज मराठी

आजच्या धावपळीच्या आयुष्यात "टार्गेट पूर्ण करा", "रिपोर्ट उद्यापर्यंत हवाय", "क्लायंट नाराज आहे" हे वाक्य रोजचं झालं आहे. नोकरी टिकवण्याची भीती, आर्थिक जबाबदारी, वरिष्ठांचा दबाव आणि घर-ऑफिसचा समतोल न साधता आल्याने करोडो लोकं दररोज मानसिक ताणातून जात आहेत. हा ताण फक्त डोक्यापुरता मर्यादित राहत नाही. तो हळूहळू तुमच्या शरीरात शिरतो आणि मोठे आजार घेऊन येतो. वेळीच लक्ष दिलं नाही तर नंतर पश्चाताप करण्यापलीकडे पर्याय राहत नाही.

1. रक्तदाब वाढण्याचा धोका - 

सततच्या टेन्शनमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन वाढतं. यामुळे रक्तवाहिन्या आखडतात आणि BP वाढतो. 

सुरुवातीला काहीच जाणवत नाही, म्हणून याला "Silent Killer" म्हणतात.

ओळखा अशी लक्षणं: अचानक डोके जड होणे, चक्कर येणे, छातीत धडधड, कारण नसताना थकवा  

बचाव कसा कराल: आठवड्यातून 2 वेळा BP तपासा. जेवणात मीठ आणि बाहेरचं जेवण कमी करा. रोज 30 मिनिटं चालणे किंवा योग करणे बंधनकारक करा. रात्री 7 तासांची झोप फिक्स करा.

2. मानसिक आरोग्य बिघडणे - चिंता आणि नैराश्य

"उद्या काय होईल", "जॉब जाईल का", "प्रमोशन मिळेल का" या विचारांनी मन पोखरतं. यातून चिंता सुरू होते आणि ती वाढली की नैराश्यात जाते.

ओळखा अशी लक्षणं: नेहमी निगेटिव्ह विचार, कामात रस न वाटणे, छोट्या गोष्टींवर राग येणे, मित्रांपासून लांब जाणे  

बचाव कसा कराल: मनातलं एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगा. लाजू नका. 10 मिनिटं श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि मेडिटेशन करा. गरज वाटल्यास सायकॉलॉजिस्टचा सल्ला घेण्यात कमीपणा नाही. तेही एक डॉक्टरच आहेत.

3. झोपेचे चक्र बिघडणे - 

रात्री अंथरुणावर पडल्यावरही मेल, प्रेझेंटेशन आणि बॉसचे शब्द डोक्यात घुमत राहतात. त्यामुळे झोप लागत नाही किंवा मध्ये मध्ये जाग येते.

महत्त्वाचे ! उशिरा झोप येणे, सकाळी फ्रेश न वाटणे, दिवसभर आळस आणि लक्ष न लागणे  

बचाव कसा कराल: झोपण्याच्या 1 तास आधी स्क्रीन बंद करा. बेडरूम फक्त झोपेसाठी ठेवा. संध्याकाळी 6 नंतर चहा-कॉफी टाळा. झोपण्याची आणि उठण्याची वेळ रोज सारखीच ठेवा.

4. पोटाचे विकार - गॅस, अॅसिडिटी

"ताणामुळे पोट बिघडतं" हे आपण ऐकतोच. यामागे कारण आहे - ताण आल्यावर मेंदू आणि पोटाचा थेट संबंध बिघडतो. त्यामुळे अॅसिडिटी, पोट दुखणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता सुरू होते.

ओळखा अशी लक्षणं : जेवणानंतर पोट जड होणे, छातीत जळजळ, भूक कमी लागणे, वारंवार पोट साफ न होणे  

बचाव कसा कराल: जेवणाच्या वेळा पाळा. घाईघाईत आणि ताणात खाऊ नका. तळले, जास्त तिखट पदार्थ कमी करा. दिवसभरात 3 लिटर पाणी प्या. जेवणानंतर 10 मिनिटं फेरफटका मारा.

5. हृदयावर वाढणारा ताण

BP, झोप न होणे आणि सततचा ताण या तिन्हींचा एकत्रित परिणाम थेट हृदयावर होतो. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.

ओळखा अशी लक्षणं: चालताना दम लागणे, छातीत दाबल्यासारखे वाटणे, अनियमित धडधड  

बचाव कसा कराल: वर्षातून एकदा फुल हेल्थ चेकअप करा. आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करा. सिगारेट आणि जास्त दारू पूर्णपणे टाळा. 40 नंतर रेग्युलर ECHO आणि ECG करून घ्या.

शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा

पगारात 4-5 हजार वाढले म्हणून आयुष्य चांगले होत नाही. पण तब्येत बिघडली की हातातला लाखोचा पॅकेजही निरुपयोगी ठरतो. ऑफिसचं काम आहे म्हणून करायचंच. पण कामासाठी स्वतःला संपवू नका.  जर तुम्हाला गेल्या 2-3 आठवड्यांपासून वरीलपैकी 2-3 लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे "कामाचा ताण आहे" म्हणून दुर्लक्ष करू नका. वेळीच फॅमिली डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला.