HEALTH IS WEALTH : सर्दी-पडसे, कणकणं जाणवतेय ? मनानेच मेडिकलमधून गोळी आणता ? चूक करताय, डॉक्टरांनी सांगितलेले सत्य वाचा - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : थोडा ऋतू बदलला की सर्दी, खोकला, घसा दुखणे सुरू होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा त्रास होतो. आणि सर्दी झाली की आपण सगळ्यात आधी काय करतो? थेट मेडिकलमध्ये जाऊन अँटी बायोटिक गोळी आणतो. डॉक्टरांना न विचारताच मनाने औषध घेतो. पण तुम्ही करत असलेली ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे माहिती आहे का?

डॉक्टर सांगतात की 90 टक्के सामान्य सर्दी ही व्हायरसमुळे होते. आणि व्हायरसमुळे होणाऱ्या कोणत्याही इन्फेक्शनवर अँटी बायोटिक औषधे अजिबात काम करत नाहीत. तुम्ही कितीही महागडी गोळी घेतली तरी त्याचा सर्दीवर काहीच परिणाम होत नाही. उलट अशा गोळ्यांमुळे शरीरात अँटी बायोटिकचा प्रतिकार तयार होतो आणि गरज असताना औषध काम करेनासे होते.

मग सर्दीवर औषधाची गरजच नाही का? तर डॉक्टर स्पष्ट सांगतात की नाही. आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी स्वतःच 4 ते 5 दिवसात या व्हायरसशी लढून सर्दी बरी करते. त्यामुळे प्रत्येक सर्दीसाठी औषधाची गरज नसते. सर्दी स्वतःहून बरी होणारा आजार आहे.

मग सर्दी झाली तर काय करावे ?

जर फक्त नाक वाहणे, नाक बंद होणे, घशात खवखव असेल तर घाबरून जाऊ नका. काही सोपे घरगुती उपाय करा.

पहिला उपाय म्हणजे भरपूर आराम करा. शरीराला लढण्यासाठी वेळ द्या. 

दुसरा उपाय भरपूर पाणी, कोमट पाणी, सूप प्या. यामुळे कफ पातळ होतो. 

तिसरा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या. 

चौथा उपाय मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा, याने घशाची खवखव लगेच कमी होते.

औषध कधी घ्यावे?

जर सर्दीसोबत तुम्हाला पिवळा किंवा हिरवा कफ येत असेल, सतत ताप 101 पेक्षा जास्त असेल, अंगदुखी खूप जास्त असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र स्वतः औषध घेऊ नका. अशावेळी थेट डॉक्टरांना भेटा. ते तपासून गरज असेल तरच योग्य औषध देतील. लक्षात ठेवा, किरकोळ सर्दीसाठी मेडिकलमधून उचललेली एक गोळी तुमची इम्युनिटी कमकुवत करू शकते. त्यामुळे पुढच्यावेळी सर्दी झाली तर आधी शरीराला संधी द्या, घरगुती उपाय करा आणि गरज वाटली तरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.