निरामय : दिवसभरात तुम्ही किती वेळ मोबाईल स्क्रोल करता ? जर उत्तर 4 ते 6 तास असेल तर सावध व्हा. तासनतास मान खाली घालून रील्स पाहणं आणि एकाच अंगठ्याने टायपिंग करणं यामुळे दोन नवे आजार तरुणांमध्ये वेगाने पसरत आहेत. एक म्हणजे ‘टेक-नेक’ आणि दुसरा ‘टेक्स्टिंग थंब’. हे आजार दिसायला साधे वाटले तरी दुर्लक्ष केल्यास कायमचं दुखणं मागे लागू शकतं.
मन सतत खाली घेऊन फोन स्क्रोल करत राहताना विचार करा, 22 किलोची पिशवी तुम्ही तासनतास मानेवर घेऊन बसलात तर काय होईल ? हेच रोज होतंय. सतत ताण आल्याने मानेच्या मागच्या स्नायूंना बारीक तडे जातात, मणके झिजतात आणि नसा दबल्या जातात.
सुरुवातीला मान जड होते, मागे गोळा आल्यासारखं वाटतं. नंतर हे दुखणं खांद्यातून हाताच्या बोटांपर्यंत उतरतं, हाताला मुंग्या येतात, चक्कर येते आणि डोकं सतत दुखतं. अनेकजण याला झोप चुकीची झाली असं समजून दुर्लक्ष करतात.
दुसरा आजार आहे अंगठ्याचा. एकाच हाताने मोबाईल धरून फक्त अंगठ्याने वर-खाली स्क्रोल करणं, दिवसातून 2000 वेळा अंगठा वर खाली हलवणे यामुळे अंगठ्याच्या मुळाशी असलेल्या टेंडनला सूज येते. वैद्यकीय भाषेत याला डी-क्वेर्वेन टेनोसायनोव्हायटिस म्हणतात. यात अंगठा दुमडताना टक-टक आवाज येतो, मनगटाजवळ टोचल्यासारखं दुखतं, बाटलीचं झाकणही उघडता येत नाही आणि मोबाईल हातातून निसटतो.
1. मांडीवर किंवा छातीसमोर न धरता डोळ्यांच्या लेव्हलला मोबाईल धरा जेणेकरून मान झुकणार नाही.
2. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद मान सरळ करून लांब पहा.
3. टायपिंगसाठी दोन्ही हात वापरा, एकाच अंगठ्यावर भार टाकू नका.
4. भिंतीला पाठ टेकवून हनुवटी मागे घ्या, 5 सेकंद थांबा, दिवसातून 10 वेळा करा.
तुम्हाला दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त मान दुखत असेल तर एकदा ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटा. स्क्रीन टाइम कमी करणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे.