HEALTH IS WEALTH : अनेकांना जेवताना सारखं पाणी पिण्याची सवय असते, तर काही जण जेवण झाल्याशिवाय पाण्याला हातही लावत नाहीत. नेमकं काय बरोबर आहे? खरं तर जेवताना थोडं पाणी प्यायल्याने काही नुकसान होत नाही, उलट फायदाही होतो. कोरडे अन्न, भाकरी, पोळी खाताना थोडं पाणी घेतल्यास अन्न सहज गिळता येते. मसालेदार किंवा तेलकट जेवणात घसा कोरडा पडतो, त्यावेळी 2-3 घोट पाणी पचनासाठी मदत करते. कोमट पाणी घेतल्यास पोटाला आराम मिळतो आणि आपण जास्त जेवणे टाळतो, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पण याचाच अर्थ असा नाही की जेवताना भरपूर पाणी प्यावे. आयुर्वेदात याला स्पष्ट विरोध आहे. आयुर्वेदानुसार आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी 'जाठराग्नी' असतो. जेवताना ग्लासच्या ग्लास पाणी प्यायल्याने हा अग्नी विझतो, पाचक रस पातळ होतात. त्यामुळे अन्न नीट पचत नाही. परिणामी गॅस, अपचन, पोट फुगणे आणि अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. सतत अशी सवय राहिली तर वजन वाढू लागते.
तज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या 30 मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीर पचनासाठी तयार होते. जेवताना खूपच तहान लागली तर फक्त 2-3 छोटे घोट घ्यावेत. आणि जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. किमान 45 ते 60 मिनिटे थांबून मगच पाणी प्यावे.
सोप्या भाषेत सांगायचे तर - जेवणाआधी पाणी अमृतासारखे, जेवताना थोडे औषधासारखे आणि जेवणानंतर लगेच प्यायले तर विषासारखे असते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी प्या, आरोग्य जपा.