HEALTH IS WEALTH : सायकलिंग आणि मानसिक आरोग्य ! मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय - टॉप न्यूज मराठी

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य सांभाळणे मोठे आव्हान बनले आहे. अनेक वेळा मानाचं आरोग्य जपण्यासाठी शाररिक श्रम करणे , वय्यां किंवा एखाद्या कामात स्वतःला गुंतवून ठेवणे सर्वोत्तम पर्याय असतो.  सायकलिंग हा केवळ व्यायाम नसून तो मनासाठी देखील एक प्रकारचे मेडिटेशन आहे.

परंतु जिममध्ये स्थिर सायकलवर केलेले सायकलिंग आणि मोकळ्या हवेत, रस्त्यावर केलेले सायकलिंग यामध्ये मोठा फरक आहे. मोकळ्या वातावरणात सायकलिंग करताना आजूबाजूचे निसर्ग, वारा आणि बदलणारे दृश्य यामुळे मन शांत होते आणि ते मेडिटेशन केल्यासारखे समाधान देते.

भारतामध्ये सध्या सुमारे 8 टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक त्रास आहे. मात्र त्यातील सगळेच उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात असे नाही. अशा परिस्थितीत सायकलिंग हा सोपा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. कारण सायकलिंग केल्याने केवळ पायांचाच नाही तर शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

या व्यायामाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तो कोणत्याही वयात करता येतो. अनेकांना वेळ नाही असे कारण असते. पण 24 तासांपैकी फक्त 15 मिनिटे जरी सायकलिंगसाठी काढली तरी पुरेशी आहेत. हळूहळू सायकलिंग करण्यापेक्षा ही 15 मिनिटे थोडी फास्ट गतीने केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. 

सायकलिंग करताना शरीरात एंडोर्फिन म्हणजेच हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. यामुळे माणसाला आनंदी आणि समाधानी वाटते. तसेच शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि थकवा कमी होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे असे ते म्हणतात.

आठवड्यातील 7 दिवसांपैकी 3 ते 5 दिवस जरी नियमित सायकलिंग केले तरी त्याचा दीर्घकाळ परिणाम दिसतो. मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठी देखील सायकलिंग फायदेशीर आहे. संशोधनानुसार नियमित सायकलिंग केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय हृदयाच्या रक्तवाहिन्या, इतर रक्तवाहिन्या आणि फुफ्फुस यांच्या कार्यक्षमतेवर देखील चांगला परिणाम होतो. मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ सायकलिंगसाठी देणे फायदेशीर ठरू शकते.