आरोग्य : हाडे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. हाडांशिवाय शरीराची कल्पनाच करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या रचनेवर उभे असते. हाडे कॅल्शियम, फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवून ठेवतात. शरीराला गरज लागेल तेव्हा ती पुन्हा सोडली जातात. पण वय वाढत गेले की हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडे कमकुवत झाली की गुडघे, कंबर, पाठ दुखणे सुरू होते. किरकोळ पडल्यावरही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
महिलांमध्ये तर ही समस्या अधिक दिसते. मासिक पाळी, गर्भधारणा, बाळंतपण, स्तनपान आणि रजोनिवृत्ती या नैसर्गिक प्रक्रियांमुळे महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होत जाते. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते. हाडांसोबतच दातांना देखील कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम कमी झाले की दात हलू लागतात, हिरड्यांचा त्रास होतो.
पोषणतज्ज्ञ सांगतात, कमी वयातच कॅल्शियमयुक्त आहार घेतला तर पुढे हाडांच्या समस्या टाळता येतात. मेनोपॉजनंतर तर हाडे झपाट्याने ठिसूळ होतात. त्यामुळे आजपासूनच आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा.
1. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दुधात सर्वात जास्त कॅल्शियम असते. एक ग्लास दुधातून साधारण 300 मिलीग्राम कॅल्शियम मिळते. रोज दूध पिणे शक्य नसेल तर दही, ताक, पनीर, चीज खा. यातूनही शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते.
2. अंजीर: अंजीर हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. यात फॉस्फरसही असते, जे हाडांच्या विकासासाठी मदत करते. एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला अंदाजे 240 मिलीग्राम कॅल्शियम मिळते. यात व्हिटॅमिन के आणि पोटॅशियमही असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 अंजीर खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि पचनाचा त्रासही कमी होतो.
3. टोमॅटो: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के असते, जे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते. आहारात टोमॅटोचा रोज समावेश करा. टोमॅटो केवळ हाडे मजबूत करत नाही, तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढायला मदत करतो.
4. पालक: पालकमध्ये भरपूर कॅल्शियम असते. 100 ग्रॅम पालकमध्ये 99 मिलीग्राम कॅल्शियम असते. आठवड्यातून किमान 3 वेळा पालक खा. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. पालकची भाजी, सूप किंवा पराठा करून खाऊ शकता.
5. सोयाबीन: सोयाबीनमध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते. ज्यांना रोज दूध पिणे जमत नाही किंवा दूध आवडत नाही, त्यांच्यासाठी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे. सोयाबीन, सोया दूध, टोफू नियमित खाल्ल्याने हाडे कमकुवत होणार नाहीत.
लक्षात ठेवा, फक्त कॅल्शियम खाऊन उपयोग नाही. कॅल्शियम शरीरात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे असते. त्यासाठी रोज 15 ते 20 मिनिटे उन्हात बसा. चालणे, हलका व्यायाम करा. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स कमी करा. जर गुडघे, कंबर सतत दुखत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.