अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. कामाचा ताण, ट्रॅफिक, प्रवासात होणारा उशीर, डेडलाईन पूर्ण करण्याची घाई या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कधीतरी कामामुळे जेवायला उशीर होणे समजू शकते, पण काही लोकांना रोजच रात्री उशीरा जेवायची सवय लागते. रात्री 9, 10 किंवा 11 वाजता जेवणे त्यांच्यासाठी सामान्य झाले आहे. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहित आहे का.
तज्ज्ञांच्या मते रात्री 8 वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असायलाच हवे. रात्री उशीरा जेवल्याने फक्त पचनच बिघडते असे नाही, तर शरीरात अनेक मोठ्या समस्या सुरू होतात. चला तर मग जाणून घेऊया रात्री उशीरा जेवण्याचे 5 मोठे धोके कोणते आहेत.
1. वजन वाढणे
रात्री उशीरा जेवणे हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. अनेक लोक डाएट करतात, रोज व्यायाम करतात तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. याचे मुख्य कारण रात्री उशीरा जेवणे हेच असते. रात्री जेवल्यावर आपण लगेच झोपतो, त्यामुळे अन्न पचत नाही आणि ते चरबीच्या रूपात शरीरात साठून राहते. त्यामुळे पोट आणि कंबरेची चरबी वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सगळ्यात आधी रात्री लवकर जेवण्याची सवय लावा.
2. झोप पूर्ण न होणे
रात्री उशीरा जेवल्याने शरीराची नैसर्गिक पचन प्रक्रिया बिघडते. पोट भरलेले असताना झोपल्यावर अस्वस्थ वाटते, छातीत जळजळ होते, सारखे जाग येते. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यावर डोके जड वाटते, दिवसभर झोप येते आणि कामात लक्ष लागत नाही. चांगली झोप हवी असेल तर रात्री हलके आणि लवकर जेवण करणे खूप गरजेचे आहे.
3. रक्तदाब अनियंत्रित होणे
रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता खूप वाढते. याशिवाय मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयाचे आजार यासारख्या समस्याही सुरू होऊ शकतात. रात्री उशीरा जेवताना आपण जास्त तेलकट, तिखट आणि जड जेवण खातो, त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. ज्यांना आधीच बीपी किंवा शुगरचा त्रास आहे, त्यांनी रात्री उशीरा जेवणे पूर्णपणे टाळावे.
4. पचनाशी निगडित समस्या
रात्री उशीरा जेवून लगेच झोपल्याने पचनाशी निगडित अनेक समस्या उद्भवतात. गॅस होणे, ऍसिडिटी वाढणे, पोट फुगणे, छातीत जळजळ होणे, उलटीसारखे वाटणे या समस्या रोजच्या होतात. पोट साफ होत नाही आणि सकाळी फ्रेश वाटत नाही. ही सवय जास्त दिवस राहिली तर अल्सरसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे रात्रीचे जेवण नेहमी पचायला हलके ठेवा.
5. शरीरातील ऊर्जा कमी होणे
रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी, थकवा, आळस यासारख्या समस्या जाणवतात. शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही, त्यामुळे दिवसभर शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते. काम करायचा कंटाळा येतो, चिडचिड होते. ही सगळी लक्षणे रात्री उशीरा जेवण्याचीच आहेत.
रात्री उशीरा जेवण्याची सवय कशी सोडावी
रात्रीचे जेवण 7 ते 8 च्या आत घेण्याचा प्रयत्न करा. कामामुळे उशीर होणार असेल तर संध्याकाळी 5 वाजता हलका नाश्ता करा, म्हणजे रात्री जास्त भूक लागणार नाही. रात्री जड, तेलकट जेवणाऐवजी खिचडी, सूप, सलाड, पोळी भाजी असे हलके जेवण घ्या. जेवणानंतर लगेच झोपू नका, किमान 30 मिनिटे हळू चाला. झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणे टाळा.
रात्री उशीरा जेवणे ही छोटी सवय वाटत असली तरी ती हळूहळू तुमचे आरोग्य बिघडवते. आजपासूनच रात्री लवकर जेवण्याची सवय लावा. काही दिवसातच तुम्हाला वजन, झोप आणि पचन यात फरक जाणवेल.
माहिती सामान्य आरोग्य विषयक ज्ञानावर आधारित आहे. जर तुम्हाला पचनाचा, रक्तदाबाचा किंवा मधुमेहाचा गंभीर त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.