आरोग्य : महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.
मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या 5 वाईट सवयी
1. खूप जास्त झोपणे
महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. गरजेप्रमाणे म्हणजे 7 ते 8 तास झोप घेतल्यास तुमची मासिक पाळी देखील नियमित होण्यास मदत होईल. दिवसा झोपण्याची सवय असेल तर ती टाळा.
2. वजनात अचानक बदल होणे
अचानक वजनात फरक दिसून आला तर त्याचा परिणाम थेट मासिक पाळीवर होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. वजन नेहमी संतुलित ठेवा.
3. चुकीचा आहार घेणे
उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार घ्या. बाहेरील तेलकट, तिखट आणि जंक फूड खाणे टाळा. हिरव्या भाज्या, फळे आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
4. गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक
अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात घेतात. या गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन पूर्णपणे बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते. वारंवार गोळ्या घेणे हे भविष्यातील गर्भधारणेसाठी देखील धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नका.
5. सतत तणावात राहणे
तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. सतत टेन्शन, चिंता किंवा कामाचा ताण घेतल्याने मासिक पाळी अनियमित होऊ शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योगा, मेडिटेशन किंवा आवडते छंद जोपासल्याने तणाव कमी होईल आणि त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल.
हा लेख सर्वसामान्य माहितीसाठी आहे. मासिक पाळी अनियमिततेचा त्रास जास्त असल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.