Health : पुरुषांमधील हार्मोन्स बदल - 30 नंतर का जाणवतो थकवा, झोप न येणे आणि चिडचिड - टॉप न्यूज मराठी

Health : आपण नेहमी महिलांमधील हार्मोन्स बदल, मेनोपॉज याबद्दल ऐकतो. पण पुरुषांमध्येही वयानुसार हार्मोन्स बदलतात आणि त्याचा परिणाम शरीर आणि मनावर होतो हे फार कमी लोकांना माहित आहे. याबद्दल बोलले जात नाही म्हणून अनेक पुरुष तो त्रास मनातच ठेवतात.

मुख्य हार्मोन कोणता?

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा मुख्य हार्मोन आहे. हा हार्मोन स्नायू बनवणे, हाडे मजबूत ठेवणे, दाढी मिशा येणे, लैंगिक इच्छा आणि उत्साह टिकवून ठेवणे यासाठी काम करतो. वयाच्या 30 नंतर हा हार्मोन दरवर्षी सुमारे 1 टक्क्याने हळूहळू कमी होऊ लागतो. काहींमध्ये तो वेगाने कमी होतो, काहींमध्ये हळू. यालाच काही ठिकाणी अँड्रोपॉज असेही म्हटले जाते, पण महिलांमधील मेनोपॉज सारखा हा एकदम बंद होत नाही, तर हळूहळू कमी होतो.

हार्मोन कमी होत असल्याची लक्षणे कोणती?

हा बदल एका दिवसात दिसत नाही, त्यामुळे अनेकांना वाटते हे वयामुळे किंवा कामाच्या ताणामुळे आहे.

सतत थकवा वाटणे, झोपूनही फ्रेश न वाटणे

रात्री झोप न लागणे किंवा पहाटे जाग येणे

वजन वाढणे, विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होणे

स्नायू कमी होणे, थोडी काम केले तरी दम लागणे

लक्ष न लागणे, गोष्टी विसरणे

विनाकारण चिडचिड, उदास वाटणे, कशातच रस न वाटणे

लैंगिक इच्छा कमी होणे

केस गळणे, दाढीची वाढ कमी होणे

ही लक्षणे एक दोन दिवस असतील तर ठीक आहे, पण महिनोनमहिने असतील तर दुर्लक्ष करू नये.

हार्मोन कमी होण्याची कारणे फक्त वय आहे का?

वय हे एक कारण आहे, पण आजकाल 30 ते 40 वयोगटातच टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची अनेक कारणे दिसतात.

रोज रात्री उशिरा झोपणे आणि 6 तासांपेक्षा कमी झोप

वजन जास्त असणे, विशेषतः लठ्ठपणा

रोज दारू पिणे, धूम्रपान करणे

दिवसभर बसून काम, व्यायामाचा अभाव

सततचा मानसिक ताण, कामाचा दबाव

मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब यासारखे आजार

स्टेरॉईड किंवा काही औषधांचा जास्त वापर

काय काळजी घ्यावी, नैसर्गिकरित्या हार्मोन संतुलित कसे ठेवावे?

यासाठी लगेच बाहेरून हार्मोन घेण्याची किंवा सप्लिमेंट घेण्याची गरज नसते. जीवनशैली बदलली तर खूप फरक पडतो.

1. झोप नीट घ्या. टेस्टोस्टेरॉन जास्तीत जास्त रात्री खोल झोपेत तयार होतो. रोज रात्री 7 ते 8 तास झोप, आणि शक्यतो रात्री 11 च्या आत झोपण्याचा प्रयत्न करा.

2. वजन नियंत्रणात ठेवा. पोटाची चरबी टेस्टोस्टेरॉनला कमी करणारे इस्ट्रोजन हार्मोन वाढवते. रोज 30 ते 40 मिनिटे चालणे, जिने चढणे, हलके वजन उचलण्याचे व्यायाम याचा खूप फायदा होतो.

3. खाण्यात काय असावे? अंडी, मासे, कडधान्ये, शेंगदाणे, तीळ, जवस, हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, आवळा. जस्त आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ महत्वाचे आहेत. रोज सकाळी 20 मिनिटे उन्हात बसल्याने व्हिटॅमिन डी मिळते. मैदा, साखर, तळलेले पॅकेट फूड कमी करा.

4. ताण कमी करा. दिवसातून 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून दीर्घ श्वास घेणे, मित्रांशी बोलणे, आवडता छंद जोपासणे याने तणावाचे हार्मोन कॉर्टिसोल कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन संतुलित राहते.

5. व्यसनांपासून दूर राहा. दारू आणि सिगारेटचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो.

6. तपासणी करा. जर तुम्हाला वरील लक्षणे सतत जाणवत असतील तर स्वतःहून कोणतेही टेस्टोस्टेरॉन बूस्टर किंवा बाजारातील जाहिरातीचे औषध घेऊ नका. डॉक्टरांना भेटा. डॉक्टर रक्त तपासणी, थायरॉईड, साखर तपासून योग्य सल्ला देतील.

लक्षात ठेवा, पुरुषांनी त्रास सहन करत बसणे, मी ठीक आहे असे दाखवणे हे पुरुषत्व नाही. शरीरात बदल होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याबद्दल बोलणे, वेळीच काळजी घेणे हेच खरे आरोग्य आहे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला असा त्रास जाणवत असेल तर फॅमिली डॉक्टरांशी बोला, ते तुम्हाला योग्य तज्ज्ञांकडे पाठवतील.