Health : हवामान बदलले की सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अशावेळी लगेच औषध घेण्याऐवजी घरातील साध्या गोष्टींमधूनही आराम मिळू शकतो. जाणून घेऊया काही सोपे आणि पारंपरिक घरगुती उपाय.
घसा दुखत असेल तर गरम दुधात हळद आणि थोडी साखर घालून प्यायल्याने आराम मिळतो. लवंग चघळल्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवत असेल तर खडी साखर आणि चिमूटभर कात जिभेवर ठेवून चघळावा. यामुळे खवखव लवकर कमी होते.
खोकल्याची ढास येत असेल तर सालासकट आख्खा वेलदोडा गालात धरावा. कात आणि साखर यांचे मिश्रण चघळल्यानेही ढास कमी होण्यास मदत होते. कफ झाला असेल तर विड्याची पाने ठेचून रस काढावा आणि मधाबरोबर चाटावा. छाती आणि पाठ शेकल्याने कफ सुटण्यास मदत होते.
घशात जळजळ होत असेल किंवा घसा बसला असेल तर वेलदोड्याचे दाणे आणि साखर एकत्र चघळावी. कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा दुखणे आणि बसणे याला उतार पडतो.
तोंड आले असेल, जीभ हुळहुळी झाली असेल किंवा तोंडात फोड आले असतील तर दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. पोटाला दोन दिवस आराम दिला की जिभेची लाली आणि पुरळ कमी होण्यास मदत मिळते.
पाय दुखत असतील तर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पायदुखी कमी होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. मध्यमवयीन महिला, अशक्त मुले आणि वृद्ध व्यक्तींना याचा उपयोग होऊ शकतो.
पोटदुखीवर ओवा आणि साखर गरम पाण्याबरोबर घेतल्याने आराम मिळतो. लहान बाळांचे पोट दुखत असेल तर पोट शेकल्याने आराम पडतो. गॅसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम मिळतो.
हे सर्व उपाय घरगुती आणि पारंपरिक आहेत. मात्र त्रास वाढत असेल, ताप येत असेल किंवा तक्रार कायम राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.