पुणे : वेळ म्हणजे सर्वकाही ही म्हण खाण्याच्या सवयींना तंतोतंत लागू होते. आपण काय खातो यापेक्षा कधी खातो याचा आरोग्यावर जास्त परिणाम होतो. दिवसभरातील शेवटचे जेवण कधी घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. बऱ्याच घरात रात्री 9 किंवा साडे 9 वाजता जेवण होते पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असे तज्ज्ञ सांगतात.
याबाबत मधुमेह प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत शेवटच्या जेवणाची वेळ का महत्त्वाची आहे याचा खुलासा केला आहे.
शेवटचे जेवण आणि झोपेत अंतर का असावे
आहारतज्ज्ञ मल्होत्रा यांच्या मते दिवसभरातील शेवटचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत पुरेसे अंतर असणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी पचनासाठी वेळ दिल्याने छातीत जळजळ होणे, अॅसिड रिफ्लक्स किंवा अपचन यासारख्या समस्या टाळता येतात. झोपेच्या अगदी आधी खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता बिघडते आणि शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही.
त्यांनी पुढे सांगितले की शेवटचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यामध्ये 12 ते 14 तासांचे अंतर ठेवल्यास चयापचय क्रिया सुधारते. शरीरात साठलेली चरबी ऊर्जेत बदलण्यास मदत होते ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
रात्री उशिरा खाल्ल्याने भूक आणि चयापचय नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. घ्रेलिन नावाच्या भूक वाढवणाऱ्या हार्मोनचे प्रमाण वाढते आणि अॅडिपोनेक्टिन म्हणजेच ग्लुकोज नियंत्रणात ठेवणाऱ्या हार्मोनचे प्रमाण कमी होते. परिणामी भूक जास्त लागते आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
शेवटचे जेवण कोणत्या वेळी घ्यावे
आरोग्य सुधारण्यासाठी दिवसभरातील शेवटचे जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी संपवावे अशी शिफारस केली जाते. यामुळे पचन चांगले होते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि झोपेची गुणवत्ता वाढते.
भारतीय घरांमध्ये रात्री 9 ते साडे 9 वाजता जेवण सामान्य आहे पण आदर्श वेळ संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान आहे. मग ते रात्रीचे जेवण असो किंवा हलका नाश्ता असो.
रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ
आदर्श वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. या वेळेत जेवण केल्याने पचनक्रिया सुधारते आणि झोप चांगली लागते. अहवालानुसार रात्री 9 च्या आधी जेवण केल्याने चरबीचे चयापचय सुधारते. हा फायदा विशेषतः लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका असलेल्या लोकांना जास्त होतो. झोपेच्या अगदी जवळ जेवण केल्याने झोप आणि पचन दोन्ही बिघडते.
संध्याकाळचा नाश्ता कधी करावा
जर तुम्हाला रात्री हलका नाश्ता करण्याची सवय असेल तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत घेणे चांगले आहे. पण हा नाश्ता हलका असावा. चिप्स, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ टाळावेत. त्याऐवजी फळे, भाजलेले मखाने किंवा सूप घेऊ शकता.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की रात्रीचे जेवण लवकर आणि हलके ठेवा, झोपण्यापूर्वी किमान दोन तास काहीही खाऊ नका आणि रोज एकाच वेळी जेवणाची सवय लावा.