आरोग्य : तुम्हाला कधी असे झाले आहे का? रात्री झोपेतून जाग आली, डोळे उघडे आहेत, सगळे दिसतेय, ऐकू येतेय, पण हात पाय हलत नाहीत. ओरडायचा प्रयत्न करता पण आवाज येत नाही. छातीवर कोणीतरी बसले आहे असे वाटते, श्वास घ्यायला त्रास होतो, खोलीत कोणीतरी उभे आहे असा भास होतो. काही सेकंद किंवा एक दोन मिनिटांनी अचानक शरीर पुन्हा हलायला लागते. असा अनुभव आला असेल तर घाबरू नका, तुम्हाला स्लीप पॅरालिसिस झाला होता.
स्लीप पॅरालिसिस म्हणजे नेमके काय?
आपली झोप दोन प्रकारची असते. एक साधी झोप आणि दुसरी स्वप्नाची झोप, जिला आरईएम स्लीप म्हणतात. स्वप्नाच्या झोपेत आपला मेंदू खूप सक्रिय असतो, पण शरीरातील स्नायूंना मेंदू तात्पुरते बंद करून टाकतो, जेणेकरून आपण स्वप्नात पळत असलो तरी प्रत्यक्षात पलंगावरून पडू नये. याला नैसर्गिक पॅरालिसिस म्हणतात.
कधी कधी आपण या स्वप्नाच्या झोपेतून अचानक जागे होतो. मेंदू जागा झाला, पण शरीराला जागे व्हायचा संदेश अजून पोहोचला नाही. त्यामुळे मेंदू जागा, डोळे उघडे, पण शरीर झोपेतच. हाच स्लीप पॅरालिसिस आहे. हा आजार नाही, तर झोपेची एक अवस्था आहे. जगात सुमारे 10 पैकी 3 लोकांना आयुष्यात कधीतरी याचा अनुभव येतो.
याचे दोन प्रकार आहेत.
एक म्हणजे झोपताना होणारा. रात्री झोप लागतानाच शरीर आधी बंद होते आणि मेंदू जागा राहतो.
दुसरा म्हणजे झोपेतून उठताना होणारा. पहाटे किंवा सकाळी जाग येताना जास्त होतो, हा प्रकार सगळ्यात जास्त दिसतो.
यावेळी भास का होतात, छातीवर दाब का जाणवतो?
जेव्हा तुम्ही अर्धवट स्वप्नात आणि अर्धवट जागे असता, तेव्हा स्वप्न आणि वास्तव एकमेकांत मिसळते. मेंदू अजूनही स्वप्नातील चित्रे दाखवत असतो. त्यामुळे खोलीत कोणीतरी आहे, काळी सावली आहे, कोणीतरी छातीवर बसले आहे असे भास होतात. याला हिप्नॅगॉजिक हॅल्युसिनेशन म्हणतात. खरेतर कोणीही नसते, तो मेंदूने तयार केलेला भास असतो. श्वास घ्यायला त्रास होतो असे वाटते कारण स्वप्नाच्या झोपेत आपला श्वास नैसर्गिकरित्या हळू आणि छोटा असतो.
आपल्याकडे याला झपाटल्यासारखे वाटणे, चेटकिण बसली, खेटीस आला असे म्हटले जाते. पण याचा भुताशी काहीही संबंध नाही. हा पूर्णपणे वैद्यकीय विषय आहे.
स्लीप पॅरालिसिस का होतो? मुख्य कारणे
1. झोप पूर्ण न होणे. रात्री उशिरा झोपणे, रोज 6 तासांपेक्षा कमी झोप, शिफ्टमध्ये काम करणे.
2. झोपेची वेळ सारखी नसणे. कधी 11 ला झोपणे, कधी 2 वाजता झोपणे.
3. पाठीवर झोपणे. संशोधनात दिसले आहे की पाठीवर झोपल्यावर स्लीप पॅरालिसिस जास्त होतो.
4. सततचा ताण, चिंता, डिप्रेशन.
5. रात्री उशिरा मोबाईल, लॅपटॉप जास्त पाहणे, झोपण्यापूर्वी जड जेवण करणे, चहा कॉफी जास्त पिणे.
6. काही लोकांमध्ये नार्कोलेप्सी नावाचा झोपेचा आजार असतो, त्यात हा त्रास वारंवार होतो.
7. कुटुंबात आधी कोणाला झाला असेल तर होण्याची शक्यता जास्त असते.
स्लीप पॅरालिसिस आला तर त्यावेळी काय करावे?
सगळ्यात आधी घाबरू नका. हा काही मिनिटांत स्वतःहून ठीक होतो. हे लक्षात ठेवा की हा भास आहे, वास्तव नाही.
डोळे बंद करून शांत श्वास घेण्याचा प्रयत्न करा.
हात पाय हलवायचा प्रयत्न न करता आधी बोटे, जीभ, चेहरा हलवण्याचा छोटा प्रयत्न करा. त्याने मेंदूला शरीर जागे करण्याचा सिग्नल जातो.
त्यावेळी कोणी जवळ असेल तर त्याला आधीच सांगून ठेवा की असे झाले तर मला हळूच हलव.
हा त्रास पुन्हा होऊ नये म्हणून काय करावे?
झोपेची वेळ रोज सारखी ठेवा. रोज एकाच वेळी झोपा आणि उठा, सुट्टीच्या दिवशीही.
रात्री 7 ते 8 तास झोप घ्या.
पाठीवर नाही तर कुशीवर झोपण्याची सवय लावा.
झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल बंद करा. गरम पाण्याने अंघोळ, हलके वाचन, दीर्घ श्वास घेणे याने झोप चांगली लागते.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 तास आधी आणि हलके घ्या.
चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक संध्याकाळनंतर टाळा.
दिवसभर थोडा व्यायाम, चालणे ठेवा, पण रात्री झोपण्यापूर्वी लगेच व्यायाम करू नका.
कधी डॉक्टरांना भेटावे?
जर तुम्हाला महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा हा अनुभव येत असेल, दिवसा खूप झोप येत असेल, कामावर लक्ष लागत नसेल, या भीतीने झोपायचीच भीती वाटत असेल तर डॉक्टरांना भेटा. हा नार्कोलेप्सी किंवा इतर झोपेच्या आजाराचा भाग असू शकतो. डॉक्टर गरज पडल्यास झोपेची तपासणी करायला सांगतील.
लक्षात ठेवा, स्लीप पॅरालिसिस म्हणजे तुमच्यावर कोणतीही बाह्य शक्ती नाही. तो तुमच्या शरीराचा तुम्हाला सांगण्याचा संकेत आहे की बाबा, झोपेची वेळ सुधार, ताण कमी कर. झोप सुधारली की हा त्रास आपोआप कमी होतो. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर त्याची भीती मनात ठेवू नका, घरच्यांशी बोला आणि झोपेची काळजी घ्या.