आरोग्य : आपण सगळे पैशाचे कर्ज ऐकले आहे, पण शरीर झोपेचेही कर्ज ठेवते हे माहित आहे का? यालाच स्लीप डेट किंवा झोपेचे कर्ज म्हणतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर, समजा तुमच्या शरीराला रोज 7 ते 8 तास झोप लागते. पण तुम्ही सोमवार ते शुक्रवार रोज 5 ते 6 तासच झोपता. म्हणजे रोज 2 तास कमी. पाच दिवसात हे 10 तासाचे कर्ज झाले. मग अनेकांना वाटते शनिवार रविवार दुपारी 12 वाजेपर्यंत झोपले की हे कर्ज फिटेल. पण विज्ञान सांगते, असे होत नाही.
झोपेचे कर्ज का तयार होते?
आपल्या मेंदूत दोन घड्याळे असतात. एक म्हणजे झोपेचा दाब. तुम्ही जेवढा जास्त वेळ जागे राहता तेवढा हा दाब वाढतो आणि तुम्हाला झोप येते. दुसरे म्हणजे शरीराचे नैसर्गिक घड्याळ, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. ते सांगते रात्री झोपायचे आणि दिवसा जागे राहायचे.
जेव्हा तुम्ही रोज उशिरा झोपता, पहाटे लवकर उठता, तेव्हा पहिले घड्याळ तर थकते, पण दुसरे घड्याळ पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शनिवार रविवार जरी तुम्ही जास्त झोपलात तरी शरीराचे घड्याळ नीट होत नाही. तुम्ही जास्त झोपल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी आणखी जड, डोके दुखते आहे असे का वाटते? त्याचे कारण हेच आहे.
वीकेंडला जास्त झोपण्याने काय होते?
काही संशोधनात असे दिसले आहे की वीकेंडला एक दोन तास जास्त झोपल्याने थकवा थोडा कमी वाटतो, पण कर्ज पूर्ण फिटत नाही. उलट त्याचे दुष्परिणाम होतात.
पहिला परिणाम, सोशल जेटलॅग. जसे परदेशात गेल्यावर वेळ बदलल्याने त्रास होतो, तसाच रोज 11 ला झोपणारी व्यक्ती शनिवारी 2 वाजता झोपली आणि रविवारी 11 ला उठली तर शरीराला वाटते तुम्ही वेगळ्या टाइमझोनमध्ये गेला आहात. सोमवारी सकाळी उठणे आणखी कठीण होते.
दुसरा परिणाम, चयापचय बिघडणे. अनियमित झोपेमुळे इन्सुलिन काम करत नाही, भूक जास्त लागते, वजन वाढू लागते. रोज कमी झोपणाऱ्या आणि वीकेंडला भरून काढणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोका जास्त दिसतो असे अभ्यास सांगतात.
तिसरा परिणाम, मनावर परिणाम. झोपेचे कर्ज असताना लक्ष लागत नाही, चिडचिड वाढते, छोट्या गोष्टींवरून राग येतो, गाडी चालवताना झोप लागण्याचा धोका वाढतो.
मग हे कर्ज फेडायचे कसे?
एकदम फेडायचा प्रयत्न करू नका. दररोज थोडे थोडे फेडा.
1. झोपायची आणि उठायची वेळ रोज सारखी ठेवा. शनिवार रविवार सुद्धा जास्तीत जास्त एक तासाचा फरक ठेवा. म्हणजे रोज 11 ला झोपत असाल तर वीकेंडला 12 च्या पुढे जाऊ नका.
2. दुपारची झोप 20 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नका. दुपारी 3 नंतर झोपू नका.
3. रात्री झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल, टीव्ही बंद करा. गरम पाणी, हलके जेवण, अंधारा खोली यामुळे झोप चांगली लागते.
4. जर आठवडाभर खूप थकला असाल तर वीकेंडला दुपारी नाही तर रात्री लवकर झोपा. सकाळी उशिरा उठण्यापेक्षा रात्री लवकर झोपणे जास्त चांगले.
5. रोजची झोप पूर्ण करा हाच उपाय आहे. कर्ज होऊच देऊ नका. 7 तास झोप ही ऐश नाही तर शरीराची गरज आहे.
लक्षात ठेवा, झोप ही बँकेसारखी नाही की सोमवार ते शुक्रवार कमी टाकले आणि शनिवारी जास्त टाकले की बॅलन्स झाला. ती रोजच्या रोज भरावी लागणारी गरज आहे. जर तुम्हाला रोज सकाळी उठताना थकवा वाटत असेल, दिवसभर चहा कॉफी लागते, सुट्टीच्या दिवशी 10 तास झोपूनही फ्रेश वाटत नसेल तर समजून जा तुमच्यावर झोपेचे कर्ज झाले आहे.
तुम्हाला सतत झोप न येणे, घोरणे किंवा दिवसभर खूप झोप येणे असा त्रास असेल तर एकदा डॉक्टरांशी बोला. चांगली झोप आली तरच चांगले आरोग्य मिळते.