आरोग्य : ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाचा निरोप आणि थंडीची चाहूल असा काळ मानला जातो पण यंदा चित्र पूर्णपणे बदलले आहे. राज्यभरात तापमान 36 ते 39 अंशांवर पोहोचले आहे आणि दमट उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. या ऑक्टोबर हिटने केवळ घामच नाही तर अनेक आजारांनाही सोबत आणले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप, उलट्या जुलाब आणि त्वचेच्या आजारांच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सकाळी थोडा गारवा आणि दुपारी कडक ऊन अशा बदलत्या हवामानामुळे व्हायरल ताप मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दुसरा मोठा त्रास म्हणजे डिहायड्रेशनचा. घाम जास्त येत असल्याने शरीरातील पाणी आणि मिठाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
दमट हवामानामुळे पोटाचे विकारही वाढले आहेत. बाहेरचे उघड्यावरचे अन्न, कापलेली फळे, नासलेले पाणी यामुळे जुलाब आणि टायफॉइडचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसत आहेत. त्वचेवर घामोळ्या, खाज सुटणे आणि डोळ्यांचे इंफेक्शन या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहेत.
डॉक्टर सांगतात की ऑक्टोबर हिटपासून वाचण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही, तर संपूर्ण दिनचर्या बदलणे गरजेचे आहे.
1. पाणी पिण्याची पद्धत बदला
तहान लागली कीच पाणी पिणे चुकीचे आहे. दिवसभरात थोडे थोडे पाणी पित राहा. रोज 3 ते 4 लिटर पाणी प्या पण त्यात फक्त साधे पाणी नको. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, मीठ साखर पाणी यांचा समावेश करा. जेणेकरून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स टिकून राहतील. बाहेर जाताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा.
2. दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळा
सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेत ऊन सर्वात जास्त असते. शक्य असेल तर या वेळेत बाहेरचे काम टाळा. बाहेर जावे लागल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. डोळ्यांवर गॉगल लावा. घट्ट आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नका, त्याऐवजी सुती आणि पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरा.
3. आहारात बदल करा
तेलकट, तिखट, मसालेदार आणि बाहेरचे तळलेले पदार्थ या काळात पूर्णपणे टाळा. आहारात दही, ताक, काकडी, टरबूज, संत्री, मोसंबी यासारख्या थंडावा देणाऱ्या फळांचा समावेश करा. सकाळी उपाशीपोटी बाहेर पडू नका. रात्रीचे जेवण हलके ठेवा.
4. घर थंड कसे ठेवावे
दुपारी खिडक्या आणि पडदे बंद ठेवा जेणेकरून गरम हवा आत येणार नाही. संध्याकाळी खिडक्या उघडा. कुलर किंवा एसीचा वापर करत असाल तर तापमान खूप कमी करू नका. 26 ते 28 डिग्री हे शरीरासाठी योग्य आहे. एसीमधून बाहेर लगेच उन्हात जाऊ नका, 5 मिनिटे थांबून जा.
5. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या
लहान मुलांना उन्हात खेळू देऊ नका. शाळेत जाताना त्यांच्या डब्यात ताक आणि पाणी जरूर द्या. ज्येष्ठ नागरिकांनी दुपारी झोप घेतल्यास त्यांना थकवा कमी जाणवेल. ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर आणि हृदयाचा आजार आहे त्यांनी तर उन्हात फिरणे पूर्णपणे टाळावे.
6. स्वच्छतेकडे लक्ष द्या
घामामुळे त्वचेवर जंतू वाढतात. दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. घाम आल्यावर ओला शर्ट अंगावर ठेवू नका. पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. घरात मच्छर होऊ देऊ नका कारण या हवामानात डेंग्यू आणि मलेरियाचाही धोका वाढतो.
जर सतत ताप 100 डिग्री पेक्षा जास्त असेल, दोन दिवसांपेक्षा जास्त उलट्या जुलाब होत असतील, चक्कर येऊन डोळ्यांसमोर अंधारी येत असेल, लघवीचे प्रमाण कमी झाले असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा. हा साधा थकवा नाही तर उष्माघाताची सुरुवात असू शकते. ऑक्टोबर हीट हा आता दोन चार दिवसांचा प्रश्न राहिलेला नाही, दिवाळीपर्यंत हे हवामान असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे औषधांपेक्षा प्रतिबंध बरा, या न्यायाने आत्तापासूनच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे हाच सर्वात मोठा उपाय आहे.