HDFC Bank launches new savings accounts for senior citizens & women : एचडीएफसी बँकेची मोठी घोषणा; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी लाँच केली दोन विशेष बचत खाती, मिळणार मोफत विमा आणि आरोग्य सेवा - टॉप न्यूज मराठी

 देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन दोन नवीन प्रीमियम बचत खाती लाँच केली आहेत. बँकेच्या प्रसिद्ध 'सेव्हिंग्ज मॅक्स' पोर्टफोलिओचा भाग म्हणून 'मॅक्स फॉर सिनियर्स' आणि 'मॅक्स फॉर हर' ही दोन नवीन विशेष खाती सादर करण्यात आली आहेत. या खात्यांद्वारे ग्राहकांना केवळ बँकिंग सेवाच नव्हे, तर मोफत आरोग्य विमा आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक आकर्षक फायदे मिळणार आहेत.

'मॅक्स फॉर सिनियर्स' (ज्येष्ठ नागरिकांसाठी): हे खाते ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. या खात्यांतर्गत मुदत ठेवींवर (FD) नेहमीपेक्षा जास्त व्याजदर दिला जाईल. ग्राहकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि औषधांवर विशेष सवलत मिळेल. सायबर फ्रॉडपासून संरक्षणासाठी विशेष सायबर सुरक्षा कव्हर आणि अपघात झाल्यास हॉस्पिटल कॅश बेनिफिटची सुविधा यात समाविष्ट आहे. 

'मॅक्स फॉर हर' (महिलांसाठी): महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या खात्याची रचना करण्यात आली आहे. खरेदी, हॉटेलिंग आणि मनोरंजनावर भरघोस कॅशबॅक देणारे प्रीमियम डेबिट कार्ड दिले जाईल. महिलांमधील कॅन्सरच्या उपचारासाठी यात विशेष आरोग्य विमा कवच समाविष्ट आहे. गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाच्या प्रोसेसिंग फीमध्ये आणि व्याजदरात विशेष सूट दिली जाईल. तसेच दरमहा विमानतळावर मोफत लाउंज अ‍ॅक्सेस मिळेल.

या दोन्ही खात्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील 'ऑटोमॅटिक स्विप-इन' सुविधा होय. खात्यात एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास, ती रक्कम आपोआप मुदत ठेवीत/एफडी रूपांतरित होईल, ज्यामुळे ग्राहकांना बचत खात्यावरही एफडीसारखे जास्त व्याज मिळू शकेल. याशिवाय ₹१० लाखांपर्यंतचा मोफत अपघात मृत्यू विमा देखील ग्राहकांना मिळणार आहे.