महाराष्ट्राची लावणी क्वीन गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा डान्स आणि तिचे कार्यक्रम म्हटले की गर्दी आलीच. नुकताच दहीहंडी उत्सवात गौतमीने जोरदार लावणी केली आणि तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. कधी बैलासमोर लावणी केल्याने तर कधी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याने गौतमी नेहमीच चर्चेत असते. पण आता गौतमी तिच्या डान्समुळे नाही तर सिनेमामुळे चर्चेत आली आहे.
लावणीच्या स्टेजवरून गौतमी पाटील थेट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा मराठी चित्रपट येत आहे ज्याचे नाव आहे देवघर ऑन रेंट. या चित्रपटातून गौतमी पाटील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
द महाराष्ट्र फाईल्स चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून टीझर पाहून अंगावर काटा येतो. हा एक भयपट असणार आहे ज्यात आध्यात्म, गूढरहस्य आणि थरार असा तिहेरी तडका पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा काय आहे तर एका रहस्यमय देवघराभोवती ही कथा फिरते. एका गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा तपास पोलीस करत असतात आणि त्यामागचे गूढ उलगडत जाते. टीझरमध्ये कलाकारांच्या चेहऱ्यावरील भीती आणि संघर्ष स्पष्ट दिसतो ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात गौतमी पाटीलसोबतच अनेक मोठे कलाकार आहेत. अभिनेता निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, वैभव चव्हाण, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हैद्राबाद, बेळगाव, बडोदा आणि इंदूर या चार वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गौतमीचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.