Gold silver Rate : सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग शुल्क थेट ६६ टक्क्यांनी वाढले! - टॉप न्यूज मराठी

गणेशोत्सवानंतर आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांची चाहूल लागली आहे. या सणासुदीच्या काळात भारतात सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र, यंदाची ही खरेदी पूर्वीपेक्षा अधिक महागणार आहे. 'भारतीय मानक ब्यूरो'ने (BIS) सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या शुल्कात थेट ६६.६७ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी उतरणाऱ्या सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

BIS च्या नवीन अधिसूचनेनुसार, हॉलमार्किंग आणि असाइंग सेंटर्सवर (AHCs) लागू होणारे दर आता बदलले आहेत. नवीन दरपत्रक खालीलप्रमाणे आहे. पूर्वी सोन्याच्या एका दागिन्यासाठी ४५ रुपये आकारले जात होते. आता हे शुल्क वाढवून ७५ रुपये प्रति दागिना करण्यात आले आहे. तसेच एका कंसाइनमेंटसाठी किमान शुल्क २०० रुपये असेल. चांदीच्या दागिन्यांसाठी आता ३५ रुपये प्रति दागिना शुल्क आकारले जाईल. तर एका कंसाइनमेंटसाठी किमान शुल्क १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय हॉलमार्किंग सेंटरसाठी सोन्याच्या दागिन्यावर ७.५० रुपये आणि चांदीवर ३.५० रुपये वेगळे शुल्क द्यावे लागेल.

या सर्व शुल्कांवर लागू असणारा GST (वस्तू आणि सेवा कर) वेगळा आकारला जाईल, ज्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत आणखी वाढणार आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, आता हॉलमार्किंगचे शुल्क वाढल्यामुळे ग्राहकांना खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे.