Global Capability Center : मावळात येणार 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर'; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील चाकण आणि रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आता मावळ तालुक्यात एक भव्य औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून मावळमधील बऊर, करंज आणि ब्राह्मणेवाडी या तीन गावांच्या परिसरात एकूण ३६६ हेक्टर क्षेत्रावर हे नवीन औद्योगिक केंद्र साकारणार आहे. जिल्हा प्रशासनाने या जमिनीची संयुक्त मोजणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, भूसंपादनाच्या मोबदल्याचा अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे.

या प्रकल्पासाठी बऊर आणि करंज गावांमधून १८३ हेक्टर, तर ब्राह्मणवाडीतून १८३ हेक्टर जमीन संपादन केली जाईल. राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मोबदला देऊन जमिनी ताब्यात घेतल्या जातील. विशेष म्हणजे, एमआयडीसीच्या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना केवळ पैशांचा मोबदलाच नव्हे, तर त्यांच्या संपादित जमिनीच्या प्रमाणात '१० टक्के विकसित भूखंड' देखील परतावा म्हणून दिला जाणार आहे.

या नव्या एमआयडीसीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स' (GCC) आणि देशाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्याने जागा दिली जाईल. यामुळे या भागात अब्जावधी रुपयांची परदेशी गुंतवणूक येण्याची दाट शक्यता आहे.

 

"चाकण-रांजणगाववरील ताण कमी करण्यासाठी हा उत्तम सोयीचा पर्याय आहे. हा प्रस्तावित परिसर थेट पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग (Expressway) आणि मुख्य राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला असल्याने वाहतूक आणि लॉजिस्टिक्ससाठी कंपन्यांना अत्यंत फायदेशीर ठरेल," अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या मेगा प्रोजेक्टमुळे मावळ आणि परिसरातील स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.