दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आरंभलेले हे आंदोलन आता देशभरामध्ये वादळासारखे पसरले आहे.
दरम्यान, या आंदोलनामध्ये आता केवळ सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच नाही, तर अनेक सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांचे नेतेही सामील झाले आहेत. राहुल गांधी यांनीदेखील या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शविला. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी हा मोर्चा जंतर-मंतरवर रोखून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराला घेराव घातला.
यावरून मात्र आता राहुल गांधी यांच्यावर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आगमू या भडकल्या आहेत. त्या म्हणाल्या की, "पीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलन करणे अजिबात योग्य नव्हते. हे चुकीचे वागणे आहे. चुकीची माहिती देऊन चुकीचे काम करू शकत नाहीत. आम्ही अशा पक्षासोबत आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत आहोत, जो चिंता करत आहे. पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे चुकीचे होते. त्यात प्रामाणिकपणाची कमतरता होती. जर त्यांच्यात प्रामाणिकपणा असता, तर ते जंतर-मंतरवर येऊन विद्यार्थ्यांसोबत राहिले असते," असेदेखील त्या म्हणाल्या.