पिंपरी-चिंचवड : आगामी गणेशोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी हा आदेश निर्गमित केला आहे.
हा मनाई आदेश 2 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 14 दिवसांसाठी लागू राहणार आहे.
1. सार्वजनिक ठिकाणी दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दांडे, शस्त्रे, सुरे, कोयते, तलवारी, काठ्या, बंदुका अथवा शारीरिक इजा होईल अशा वस्तू बाळगण्यास सक्त मनाई.
2. व्यक्ती किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे, चित्रे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई.
3. मोठ्या आवाजात अवमानकारक घोषणा देणे, वाद्य वाजवून सभ्यतेला धोका निर्माण करणे यावर बंदी.
4. राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशी आक्षेपार्ह भाषणे करणे किंवा साहित्याचा प्रसार करण्यास प्रतिबंध.
5. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास आणि पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता सभा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई.
शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.