नवी दिल्ली: ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दारू कंपन्यांवर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ओल्ड माँक, मॅकडॉवेल्स नंबर 1, अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज आणि बॅगपायपर सारखे देशातील सर्वाधिक विकले जाणारे ब्रँड यामध्ये अडकले आहेत. तपासणीत या कंपन्यांनी रम आणि व्हिस्कीमध्ये बाहेरून कृत्रिम फ्लेवर मिसळून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर FSSAI ने तातडीने या ब्रँड्सची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
FSSAI च्या नियमानुसार खरी रम किंवा व्हिस्की ही कच्च्या मालापासून फर्मेंटेशन, डिस्टिलेशन आणि बॅरलमध्ये मॅच्युरेशन या नैसर्गिक प्रक्रियेतून बनवली जाते. त्यामुळे तिला नैसर्गिक चव आणि सुगंध येतो. मात्र FSSAI च्या लॅब टेस्टिंग आणि तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली.
अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार अनेक कंपन्या न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर करून दारू बनवत आहेत. या अल्कोहोलला कोणतीही स्वतःची चव नसते. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या बाहेरून व्हिस्की किंवा रमचे कृत्रिम फ्लेवर मिसळत आहेत. त्यानंतर ते थेट स्टँडर्ड रम किंवा व्हिस्की म्हणून बाजारात विकले जात आहेत.
FSSAI ने याला थेट फसवणूक म्हटले आहे. अथॉरिटीचे म्हणणे आहे की, जर उत्पादनात नैसर्गिक मॅच्युरेशन नसेल आणि बाहेरून फ्लेवर मिसळला असेल तर त्याला "रम-फ्लेव्हर्ड स्पिरिट" किंवा "व्हिस्की-फ्लेव्हर्ड स्पिरिट" म्हणूनच लेबल करणे बंधनकारक आहे. पण कंपन्या तसे न करता महागड्या स्टँडर्ड ब्रँडच्या नावाने ते विकत आहेत.
FSSAI ने ओल्ड माँक XXX रमच्या एका प्रकारावर केलेल्या दाव्यालाही खोडून काढले आहे. या बाटलीवर "7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड" असे लिहिले होते. मात्र लॅब रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर आली. या रममध्ये मॅच्युर रम स्पिरिट केवळ 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. उरलेले 95 टक्क्यांहून अधिक न्यूट्रल स्पिरिट आहे.
नियमानुसार, मिश्रणातील सर्वात कमी वयाच्या स्पिरिटच्या आधारावरच वयाचा दावा करता येतो. त्यामुळे हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि नियमांचा भंग करणारा असल्याचे FSSAI ने म्हटले आहे.
लॅब अहवालाच्या आधारे FSSAI ने खालील उत्पादनांची विक्री आणि उत्पादन तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
मोहन मीकिनच्या ओल्ड माँक रमचे काही प्रकार, युनायटेड स्पिरिट्सच्या मॅकडॉवेल्स नंबर 1 रम, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रू बेव्हरेजेसच्या बॅगपायपर डीलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डीलक्स XXX रम, तसेच असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीजच्या सेंट्रल प्रोव्हिन्स व्हिस्की आणि मॅकडॉवेल्स नंबर 1 सेलिब्रेशन मॅच्युर XXX रम या ब्रँड्सचा समावेश आहे.
अथॉरिटीने स्पष्ट केले की, अशी उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाची नाहीत तर ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील करतात. कमी किमतीचे न्यूट्रल अल्कोहोल वापरून त्यावर महागड्या ब्रँडचे लेबल लावले जात आहे. यामुळे ग्राहकांना खऱ्या मॅच्युर व्हिस्की किंवा रमच्या नावाने निकृष्ट दर्जाचे पेय दिले जात आहे.FSSAI ने सर्व राज्यांच्या फूड सेफ्टी आयुक्तांना या उत्पादनांचा साठा जप्त करून बाजारातून त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढे कोणत्याही कंपनीने असे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
या कारवाईमुळे आता बाजारात उपलब्ध असलेल्या दारूच्या बाटल्यांवरील लेबलिंग आणि दर्जाबाबत ग्राहकांमध्ये मोठी शंका निर्माण झाली आहे.