छत्रपती संभाजीनगर : राज्यात अन्नसुरक्षेवरून FDA ने मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. तपासणीत खराब वास येणारे सडके पनीर, वारंवार तळून काळे पडलेले तेल, उघड्यावर ठेवलेले नूडल्स, टॉयलेटजवळ भाज्या कापणे, स्वयंपाकघरात माश्यांचा प्रादुर्भाव आणि प्रचंड अस्वच्छता आढळली. या हॉटेलला एप्रिल 2025 मध्ये 50 हजारांचा दंड झाला होता, तरी सुधारणा न झाल्याने थेट परवाना रद्द करण्यात आला. तर मुंबईत मॅकडोनाल्ड्ससह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून गुटखा-पानमसाला प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
1. दूध आणि पनीर भेसळीवर राज्यभर 500 हून अधिक सॅम्पलची तपासणी.
2. बंदी असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांच्या गोदामांवर छापे - 2 कोटींचा माल जप्त.
3. नामांकित हॉटेल, स्वीट मार्ट आणि डेअरींवर अचानक तपासणी.
4. नियम न पाळणाऱ्या 120 हून अधिक हॉटेलांना नोटिसा आणि 40 हॉटेलांचे परवाने निलंबित.
सध्या सुरू असलेल्या कारवायांमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी धास्ती पसरली आहे. लोकांमध्येही "बाहेर खावे की नाही" असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र धाराशिवसारख्या जिल्ह्यात लॅब रिपोर्टला विलंब होत आहे - 4 महिन्यात 80 सॅम्पलपैकी फक्त 8 रिपोर्ट आले, 72 प्रलंबित आहेत. त्यामुळे पुढील काळात FDA लॅबची क्षमता वाढवून जलद कारवाई आणि थेट FIR दाखल करण्याच्या तयारीत आहे.