EKNATH SHINDE : " सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणे म्हणजे संविधानावर हल्ला...! " एकनाथ शिंदे यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : दिल्लीत इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टावर काढलेल्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने केलेला हा प्रकार म्हणजे देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे शिंदे म्हणाले. हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर आणि संवैधानिक संस्थांवर हल्ला असून याचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी नेमके काय म्हटले तर, काल सुप्रीम कोर्टावर चाल करून जाणे आणि दबाव आणणे अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. लोकशाहीत प्रत्येकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, पण मोर्चा घेऊन कोर्टात जाणे ही कोणती पद्धत आहे. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जिंकता येत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे. देशाला अराजकतेकडे नेण्याचे काम विरोधक करत आहेत, जे अतिशय दुर्दैवी आणि देशासाठी घातक आहे. विरोधक परकीय शक्तींच्या माध्यमातून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. केंद्रात आमची सत्ता येणार नाही या मानसिकतेतून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला.

दरम्यान या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे इंडिया आघाडी आक्रमक होताना दिसत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून या मोर्चाला लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरचा हल्ला म्हणून पाहिले जात आहे. दिल्लीतील या मोर्चात राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक खासदार सहभागी झाले होते. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप होत असताना, इंडिया आघाडी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.