मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आठ जुलै रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून महत्वाची बैठक विधान भवन येथे पार पडली . या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते. शरद पवार जेव्हा विधान भवन येथे आले त्यांच्या स्वागतासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक सोडून पवार यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर थेट शब्दात आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले होते की, " शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत पण एखाद्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणे त्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता घसरते. आणि ती कमी होते. शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. त्यामुळे आमचं मन दुखावलं आहे. " अशा शब्दात संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली.
यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड भाषेत संजय राऊत यांना ठणकावल आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, " शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत. ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. ती आम्ही जगतोय. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ बिघडले असेल. त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केले आहेत. तिथे त्यांनी जावं आणि उपचार करून घ्यावेत. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असून ते एनडीएकडे जाणार अशा जोरदार चर्चा असताना एकनाथ शिंदेंच्या या भेटीकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष आहे.