Ek Hota Malin (2026) - 'एक होतं माळीण' :निसर्गाचे रौद्ररूप आणि दरड कोसळण्याचा तो थरार मोठ्या पडद्यावर.. - टॉप न्यूज मराठी

'एक होतं माळीण' (Ek Hota Malin) : हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट अखेर २४ जुलै २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ओढवलेल्या भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दरड दुर्घटनेवर (Landslide Incident) हा चित्रपट आधारित आहे.  या दुर्घटनेमध्ये दीडशे पेक्षा जास्त व्यक्तींनी आपला जीव गमावला तर कित्येक जन जखमी अवस्थेत मिळाले. 

 

एका रात्रीत मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळून मातीखाली गाडल्या गेलेल्या संपूर्ण गावाची, तेथील रहिवाशांच्या वेदनांची आणि संघर्षाची ही सत्य कहाणी आहे.  माळीण गावाचा हुबेहूब आणि भव्य सेट या चित्रपटासाठी उभारण्यात आला आहे.  दुर्घटनेचा थरार पडद्यावर जिवंत करण्यासाठी उत्कृष्ट VFX आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  

'ड्रीम डॉट क्रिएशन' प्रॉडक्शन चे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन व संवाद दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी केले आहे. कथा व पटकथा राजू राणे यांनी लिहिली आहे. चित्रपटात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे यामध्ये प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.

चित्रपटातील प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे आणि अनुज ठाकरे यांसारखे कलाकार गावातील लोकांचे कौटुंबिक आयुष्य आणि दुर्घटनेनंतरचा संघर्ष पडद्यावर साकारणार आहेत. हा चित्रपट केवळ एका दुर्घटनेवर आधारित नसून, मानवी भावना आणि निसर्गाचे रौद्ररूप यांमधील संघर्षाचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. निसर्गाचे रौद्ररूप आणि दरड कोसळण्याचा तो थरार अचूकपणे टिपण्यासाठी दर्जेदार तंत्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. राजा फडतरे यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून माळीण गाव आणि दुर्घटना प्रभावीपणे टिपली आहे. नितेश नांदगावकर यांनी चित्रपटासाठी माळीण गावाचा भव्य आणि हुबेहूब सेट उभारला आहे. रहमान अब्दुल्ला यांनी चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या दरड दुर्घटनेचे दृश्य जिवंत करण्यासाठी अत्याधुनिक VFX चा वापर केला आहे. 

नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर लाँच करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १२ वर्षांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि मानवी भावविश्व अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत