Eetha shraddha kapoor: "Stree Is Back" : ‎'लावणी सम्राज्ञी' विठाबाईंची यशोगाथा आता रुपेरी पडद्यावर; 'ईठा' चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत! ‎ - टॉप न्यूज मराठी

हॉरर-कॉमेडी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका अत्यंत आव्हानात्मक आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. अशा सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित 

‎'ईठा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

‎लोककलेचा सुवर्णकाळ आणि संघर्ष

‎'ईठा'हा चित्रपट केवळ एक बायोपिक नसून, तो महाराष्ट्राच्या मातीतील समृद्ध लोककला आणि तमाशा परंपरेचा गौरव करणारा एक भव्य कलाविष्कार ठरणार आहे. अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत विठाबाईंनी लहान वयातच आपल्या कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. नृत्याची उपजत आवड, दमदार आवाज आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी तमाशाच्या फडात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या अदाकारीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आणि पुढे याच कौशल्यामुळे त्यांना 'लावणी सम्राज्ञी' हा बहुमान मिळाला.

‎रुढी-परंपरांना छेद देणारी विठाबाईंची कहाणी

‎ज्या काळात लावणी आणि तमाशा कलाकारांकडे समाज एका वेगळ्या आणि दुय्यम नजरेने पाहत असे, अशा काळात विठाबाईंनी या कलेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजातील पूर्वग्रह बाजूला सारत त्यांनी आपल्या कलेच्या ताकदीवर लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. त्यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष, कौटुंबिक चढ-उतार आणि कलेप्रती असलेली अथांग निष्ठा या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर येणार आहे.

‎श्रद्धा कपूरचा नवा अवतार

‎या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी श्रद्धा कपूरने प्रचंड मेहनत घेतल्याचे समजते. लावणी नृत्यातील बारकावे, हावभाव आणि नजाकत अचूक पकडण्यासाठी तिने खास प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामुळे ग्लॅमरस भूमिकांनंतर आता श्रद्धाचा एक परिपक्व, वास्तववादी आणि सशक्त अभिनय प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‎महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा 'ईथा' चित्रपटाचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असून, प्रेक्षकांमध्ये आतापासूनच या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‎

‎

‎

‎