दिवाळी म्हटले की लहान मुलांना फटाक्यांची सगळ्यात जास्त उत्सुकता असते. पण दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे भाजण्याच्या घटना घडतात. थोडे लक्ष दिले तर मोठा अपघात टाळता येतो. पालक म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा.
फटाके वाजवताना घ्यायची काळजी -
पहिली गोष्ट म्हणजे मुलांना कधीही एकटे फटाके वाजवू देऊ नका. सोबत नेहमी मोठी व्यक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे फटाके वाजवताना सुती कपडे घाला. सिंथेटिक कपड्यांना लगेच आग लागते. मुलींनी ओढणी किंवा मोठा फ्रॉक घालून फटाके वाजवू नये. तिसरी गोष्ट म्हणजे फुलबाजी, अनार यासारखे फटाके हातात धरून वाजवू नका. नेहमी जमिनीवर ठेवून मग पेटवा. फटाका पेटवल्यावर लगेच लांब व्हा. उगीच त्याच्या जवळ जाऊन बघू नका. एक फटाका पेटला नाही तर लगेच दुसरा फटाका त्याला लावू नका. त्यात पाणी टाकून बाजूला करा. फटाके वाजवताना जवळ पाण्याची बादली भरून ठेवा.
कानाचे आणि डोळ्यांचे संरक्षण पण महत्वाचे आहे. मोठे बॉम्ब वाजवताना कानात कापूस टाकावा. डोळ्यात ठिणगी जाऊ नये म्हणून चष्मा वापरला तरी चालेल. रात्री फटाके वाजवताना अंधारात वाजवू नका. जिथे व्यवस्थित प्रकाश आहे तिथेच वाजवा.
हात भाजल्यास काय करावे -
सगळ्यात आधी घाबरून जाऊ नका. जर हात थोडा भाजला असेल, लाल झाला असेल तर लगेच 10 मिनिटे नळाच्या थंड पाण्याखाली धरा. बर्फ कधीही थेट भाजलेल्या जागेवर लावू नका. त्याने फोड जास्त येतो. टूथपेस्ट, हळद, तेल, अंडी असे काहीही भाजलेल्या जागेवर लावू नका. याने इन्फेक्शन वाढते.
थंड पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने हलके पुसून घ्या. त्यावर कोरफडीचा गर म्हणजे एलोवेरा जेल लावू शकता. जर फोड आले असतील तर फोड फोडू नका. त्यावर जंतुनाशक क्रीम लावा आणि सुती कापडाने बांधून ठेवा.
कधी डॉक्टरकडे जावे -
जर भाजलेली जागा मोठी असेल, फोड खूप मोठे असतील, किंवा मूल खूप रडत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा. तोंड किंवा डोळ्याजवळ भाजले असेल तर घरगुती उपाय करू नका, थेट दवाखान्यात जा. दिवाळीच्या आधी घरात बर्नोल क्रीम, कापूस, बँडेज आणून ठेवा.
थोडी काळजी घेतली तर दिवाळी आनंदातच पार पडेल. मुलांना फटाक्यांपेक्षा दिव्यांची दिवाळी जास्त आवडेल असे काहीतरी नवीन करून दाखवा.