पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या वादाने नवे वळण घेतले आहे. अभिनेत्री आणि शिंदे सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटातील कोणतेही पात्र रुपाली चाकणकर यांचे असल्याचे आपण कुठेही म्हटले नसताना, चाकणकर या स्वतःहून तो रोल आपला असल्याचे सांगत आहेत आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव टाकून चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत, असा प्रमुख आरोप सय्यद यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नुकतेच 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. सय्यद यांनी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' नावाच्या चित्रपटाचे टीजर सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर दुसरे टीजर आल्यानंतर चाकणकर यांनी तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला. चाकणकर यांनी सय्यद यांच्यावर 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आपण कुठेही या चित्रपटात रुपाली चाकणकर यांचा रोल असल्याचे म्हटलेले नाही, तरीही त्या स्वतःहून तो आपल्यावर ओढवून घेत आहेत, असे दिपाली सय्यद म्हणाल्या. "त्यांना वाटत असेल तर चित्रपट पूर्ण झाल्यावर मी तो त्यांना दाखवायला तयार आहे. हा चित्रपट कोणाचीही बायोग्राफी नाही, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक दाखवणारा चित्रपट आहे. मी रुपाली चाकणकर यांच्यासंदर्भात कोणतीही अश्लील पोस्ट सोशल मीडियावर केलेली नाही, मी फक्त माझ्या चित्रपटाचे टीजर पोस्ट केले आहे. उलट रुपाली चाकणकर माझी बदनामी करत आहेत. माझा उदरनिर्वाह या चित्रपटावर आहे, त्या मला मेंटली टॉर्चर करत आहेत," असा आरोप करत सय्यद यांनी चाकणकर यांना 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याचे सांगितले. काहीही झाले तरी हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणारच...!" असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतरच पोलिसांनी 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चाकणकर यांनी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाच्या टीजरमधून आपली बदनामी होत असल्याचा दावा करत 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या आता करत असल्याचे सांगत, चित्रपटातून अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पसरवला जात असल्याची त्यांची तक्रार आहे. या संपूर्ण प्रकरणावर चाकणकर यांनी अद्याप सविस्तर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.