DHULE : धुळ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, हिसाळे गावाजवळ महामार्गावर रास्ता रोको, अर्धा तास वाहतूक ठप्प - टॉप न्यूज मराठी

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावाजवळ आज शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. रब्बी हंगामातील पिकांसाठी अनेर धरणाचे पाणी तातडीने सोडावे आणि पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी धरणातील पाणी राखीव ठेवावे या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या बळीराजावर आता हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. लाल झेंडे हातात घेतलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी बसेससह ट्रक्स महामार्गावरच थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत

अनेर धरणाचे पाणी रब्बी पिकांसाठी तातडीने सोडावे, पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी धरणातील पाणी राखीव ठेवावे, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत द्यावी, शेतमजुरांना 25 हजार रुपये द्यावेत, कर्जमाफी करावी आणि शेतीसाठी दिवसा 12 तास वीजपुरवठा करावा अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या या उग्र रूपामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 प्रतिनिधी : उबेद कादरी, धुळे