धुळे - शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या धुळे दौऱ्यापूर्वी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धुळ्यातील शिवतीर्थ चौकात मराठा समाजाच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जाहीर सभेत एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच धुळ्यात मराठा समाजाने थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवतीर्थ चौकात मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते. त्यांनी दादा भुसे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनामुळे शिवतीर्थ चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या घटनेमुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यावर या आंदोलनाचा परिणाम होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.