धाराशिव : सणांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून पुणे येथील द पुना मर्चंट चेंबर्सच्या वतीने धाराशिव परिसरात दिवाळी फराळ वाटप उपक्रम राबविण्यात आला. यंदा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गरीब, वंचित कुटुंबांना आणि पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांना लाडू-चिवड्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत राघुचीवाडी येथील शेतमजूर व गरीब कुटुंबांना, येडशी येथील आदिवासी राजगोंड समाजवस्तीतील नागरिकांना तसेच धाराशिव शहरातील कुडमूडे पांगुळ जोशी समाजाच्या सांजा चौक परिसरातील पालावरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला.
द पुना मर्चंट चेंबर्सच्या वतीने दरवर्षी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो. केवळ फराळ देणे एवढाच उद्देश नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणांचा आनंद आणि आपुलकीची भावना पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दलाराम चौधरी, बन्सी करपे, हनुमान बिष्णोई, जितेंद्र चौधरी व परशुराम कोल्हे उपस्थित होते. राघुचीवाडी येथील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
पालावरच्या शाळांमधील वंचित घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले. प्रयोगशील शिक्षक व बालसाहित्यकार समाधान शिकेतोड यांनी या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन केले.
वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीच्या नात्याचे सुंदर उदाहरण ठरला. दिवाळीचा खरा आनंद वाटण्यात असतो, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.