जालना : बातमी आहे जालना जिल्ह्यातली, परंतु नक्कीच एक असा धडा की जो आजच्या तरुण पिढीने कायम लक्षात ठेवायला हवा. सध्या सोशल मीडियामुळे जग प्रचंड जवळ आले आहे. अगदी समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत जरी नसेल तरीही एखाद्या मेसेजनेही चॅटिंग सुरू होते. पण त्याचा अंत मात्र भयानक होऊ शकतो. अशीच घटना संभाजीनगरच्या एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. अगदी काहीच महिन्यांपूर्वी आरोपी तरुणीच्या त्रासाला कंटाळून छत्रपती संभाजीनगर मधील करमाड येथे एका तरुणान आत्महत्या केली होती आणि आता अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून या तरुणीने एका तरुणाला 80 हजाराचा चुना लावलाय.
सोशल मीडियावर सध्या अनेक असे चॅटिंग ॲप आहेत ज्यावर तरुणाई अगदी तात्पुरत्या गप्पा मारण्यासाठी सुद्धा पार्टनर शोधू शकते. परंतु याच माध्यमातून अनेक बंटी बबली देखील उदयाला आले आहेत. सोशल मीडियाच्या साइटवरून ओळख करून घेऊन ही ओळख पुढे वाढवायची असा धंदा ही बबली करत होती. त्यानंतर अश्लील व्हिडिओ बनवून तिचा बंटी मोठ्या प्रमाणावर लुटमार करत होता. थोडे थोडके नाही तर अशा सहा जणांचा धंदा होता.
घडलेल्या या घटनेमध्ये जालन्यातील नवा मुंडा परिसरात या तरुणीने जाळं फेकलं होतं. हा तरुण त्या जाळ्यामध्ये अडकला आणि अखेर तिने या तरुणाला एकांतात भेटायला बोलावलं. त्यानंतर तिच्या साथीदारांनी या युवकाला जबर मारहाण केली, आणि या तरुणांकडून 80 हजार रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या टोळीला आता गजाआड देखील करण्यात आले .
धक्कादायक म्हणजे सारख्याच पद्धतीने या तरुणीने तब्बल सहा जणांना गुंडाळल आहे. या तरुणीकडून आणि टोळीतील इतर आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि एक रिक्षा असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत सहा गुण हे उघडकीस आले आहेत. अजूनही पोलीस तपास सुरू आहे. आणि याही पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे देखील बोलले जाते आहे.
त्यामुळे जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही तरुण किंवा तरुणीशी बोलत असाल तर सावध व्हा. जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसाल तर वैयक्तिक माहिती कोणत्याही प्रकारे त्या व्यक्तीपर्यंत जाईल किंवा समक्ष भेटणे ,तुमचा फोटो कोणत्याही प्रकारचा साधा व्हिडिओ देखील शेअर करू नका. तरुणींकडून येणारे कोणतेही आमिष पाहून स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.