Crime Parabhani : परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त - टॉप न्यूज मराठी

परभणी - जिंतूर रोडवरील पाथरी बायपास रोडवर काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने धर्मापुरी शिवारातील जिंतूर ते पाथरी बायपास रोडवरील पुलाजवळ सापळा रचला.

यावेळी अंधारात एक संशयित i20 कार थांबलेली आढळून आली. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत 5 इसमांना ताब्यात घेतले. या इसमांनी तोंडाला पांढरा रुमाल बांधला होता आणि त्यांच्या हातात तलवार, लोखंडी रॉड अशी हत्यारे होती.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी बायपास रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडवून लुटमार करण्याच्या आणि शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने थांबल्याची कबुली दिली.

यासोबतच त्यांनी आणखी एक धक्कादायक कबुली दिली. त्यांच्याजवळ भारतीय बच्चों के बँक अशा लिहिलेल्या खेळण्यातील नोटा होत्या. त्यावर खऱ्या चलनी नोटा लावून लोकांना देऊन फसवणूक करण्याचा त्यांचा डाव होता.

पोलिसांनी या टोळीकडून एक धारदार तलवार, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूडच्या 5 पुड्या, दोरी आणि गुन्ह्यात वापरलेली i20 कार असा एकूण 4 लाख 57 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पुढील तपास परभणी पोलिस करत आहेत.

प्रतिनिधी: विष्णु सायगुंडे ,परभणी