पुणे : शरीराविरुद्ध गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला आणि सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट 1 चे सहा पोलीस निरीक्षक बिरज राऊत आणि पोलीस अंमलदार हे युनिट 1 च्या हद्दीत शोध घेत असताना पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील हद्दपार आणि गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी इस्माईल इब्राहिम शेख हा बसवेश्वर मठ या ठिकाणी गणपतीचे विसर्जन पाहत आहे.
खात्रीशीर बातमी मिळाल्याने ही माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 श्री दिपक लगड यांना कळविण्यात आली. त्यांनी नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
त्यानुसार सहा पोलीस निरीक्षक बिरज राऊत आणि पोलीस अंमलदार यांनी नमूद ठिकाणी पाहणी केली असता इसम मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इस्माईल इब्राहिम शेख वय 22 वर्षे रा. जुनी वडारवाडी, बसवेश्वर मठाजवळ, चतु:श्रृंगी पुणे असे सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री गौरव हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर श्री शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 1 गुन्हे शाखा श्री दिपक लगड यांचे सूचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक बिरज राऊत, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नांगरे आणि संतोष अणुसे यांनी केली आहे.