CRIME NEWS : कानपूर हादरलं, सूनच निघाली सासऱ्याची मारेकरीन, 6 लाखांची सुपारी देऊन 26 वेळा वार, हत्येनंतर ढसाढसा रडण्याचं केलं नाटक - टॉप न्यूज मराठी

कानपूर : कानपूरमधील कल्याणपूर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटमधील कोट्यधीश औषध व्यापारी विनीत मिनोचा हत्याप्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांची 30 वर्षीय सून शालू मिनोचा हिलाच अटक केली आहे. पैशांवरून असलेल्या वादातून आणि घरातील कडक नियंत्रणाला कंटाळून शालूने 6 लाखांची सुपारी देऊन सासऱ्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

विनीत मिनोचा हे कानपूरमधील बिरहाना रोडवरील फार्मा ट्रेडर्सचे मालक होते. 5 सप्टेंबर 2026 रोजी शनिवारी रात्री ते त्यांच्या C-104 फ्लॅटमध्ये एकटे होते. त्यांची पत्नी पुनिता या एका आठवड्यापूर्वी गाझियाबादला गेल्या होत्या. तर मुलगा सुब्रत, सून शालू आणि 6 वर्षांचा नातू हे एका पार्टीला गेले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार शालूने आधीच कट रचला होता. तिने घरकाम करणारा माजी नोकर विशाल गौतम याला 6 लाख रुपये देऊन सासऱ्याला मारण्यास सांगितले. विशालवर 2 लाखांचे कर्ज होते आणि तो 2022 पासून बेरोजगार होता. त्याने त्याचा मित्र राज किशोर याला 30 हजारांचे आमिष दाखवून सोबत घेतले.

हत्येच्या 20 दिवस आधी शालूने घराची मूळ चावी विशालला दिली आणि डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी 1200 रुपयेही दिले. हत्येच्या दिवशी तिने अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाला फोन करून शिवम नावाचा व्यक्ती गजरा घेऊन येईल त्याला आत सोड असे सांगितले जेणेकरून रजिस्टरमध्ये विशालचे खरे नाव येणार नाही.

रात्री 9.38 वाजता विशाल आणि राज किशोर डुप्लिकेट चावीने फ्लॅटमध्ये शिरले आणि मुलाच्या बेडरूममध्ये लपून बसले. विनीत मिनोचा रात्री 10.58 वाजता घरी आले आणि बेडरूम तपासायला गेले असता त्यांना दोघे दिसले. घाबरलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चाकूने 26 वेळा वार केले आणि गळा चिरला. रात्री 11.28 वाजता ते मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेले.

सुरुवातीला प्लॅन वेगळा होता

पोलिस आयुक्त रघुबीर लाल यांनी सांगितले की शालूचा पहिला प्लॅन सासऱ्याला झोपेत उशीने तोंड दाबून मारायचा होता जेणेकरून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे वाटेल. विशालने नकार दिल्यानंतर चाकूने वार करण्याचा कट रचला गेला.

हत्येचे कारण काय

पोलिस तपासात समोर आले आहे की विनीत मिनोचा हे कुटुंबावर खूप कडक नियंत्रण ठेवायचे. मुलगा सुब्रत वडिलांच्या व्यवसायात काम करायचा पण त्याला पगार म्हणून फक्त 35 हजार रुपये मिळायचे. सुनेला शालूला महिन्याला फक्त 10 ते 12 हजार रुपये खर्चायला दिले जायचे. प्रत्येक खर्चाचा हिशोब मागितला जायचा.

याशिवाय 15 ते 20 दिवसांपूर्वी विनीत यांनी घरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. शालूला वाटायचे की तिच्या प्रायव्हसीवर आणि खासगी आयुष्यात सतत पाळत ठेवली जात आहे. याच रागातून तिने हे पाऊल उचलले.

कसा झाला पर्दाफाश

हत्येनंतर पहाटे 3 ते 4.30 च्या सुमारास कुटुंब घरी आले तेव्हा मुख्य दरवाजा उघडा होता आणि विनीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सुरुवातीला शालू ढसाढसा रडत नाटक करत होती.

पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुण फ्लॅटमध्ये शिरताना दिसले. त्यातील एक माजी नोकर विशाल असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला आणि राज किशोरला सोमवारी रतनपूर परिसरातून एन्काऊंटरनंतर अटक केली. दोघांनी पायात गोळी लागल्यानंतर शालूचे नाव घेतले.

पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता 21 दिवसांत शालू आणि विशालमध्ये 330 हून अधिक वेळा कॉल झाल्याचे समोर आले. महिला पोलिसांसमोर चौकशी केली असता शालूने गुन्हा कबूल केला.

तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.