CRIME NEWS : "दुःखाचा आधार शोधायला गेले, पण अडकले पोलिसांच्या बेडीत ! 3 लाखात मुलगा 'खरेदी' करायला निघालेल्या कुटुंबाचा प्लॅन फसला" - टॉप न्यूज मराठी

लुधियाना : घरातला दिवा विझल्यावर अंधारात वाट सापडावी म्हणून एका कुटुंबाने चुकीचा रस्ता पकडला. आणि त्या रस्त्याचा शेवट थेट पोलीस कोठडीत झाला. 

पंजाबच्या लुधियाना येथील बलबीर सिंग यांनी 2025 मध्ये 18 वर्षांचा मुलगा कॅन्सरमुळे गमावला. या धक्क्याने पत्नी सिमरन डिप्रेशनमध्ये गेल्या. घरातली हसणारी पावलं बंद झाली. नातेवाईकांनी "दत्तक घ्या" असा सल्ला दिला. पण कायदेशीर कागदपत्रांच्या फेऱ्यात न पडता बलबीर यांनी दुसराच मार्ग निवडला.

घरी स्वयंपाकाला येणाऱ्या रेश्मा नावाच्या बाईने सांगितले, "बिहारमधून लहान मुलगा आणून देऊ. 3 लाख लागतील". पैशांचं आमिष आणि पोटचा गोळा परत मिळवण्याची आस... बलबीर तयार झाले. रेश्माने मुंगेरमधील एका दलालाशी बोलणी केली. दलालाने शेजारच्या 3 वर्षांच्या मुलाचा फोटो पाठवला. "हाच हवा" असं सांगून डील फायनल झाली. दोन दिवसांपूर्वी बलबीर, त्यांची दोन नातेवाईक महिला आणि ड्रायव्हर कार घेऊन पाटण्यात आले. 

प्लॅन असा होता की, बुधवारी रात्री दलाल त्याच्या 16 वर्षांच्या मुलीसोबत लाल दरवाजा भागातून मुलाला उचलेल आणि सरळ पंजाबला पळेल. पण नशिबाने दुसरंच लिहिलं होतं. मुलगा बेपत्ता होताच मुंगेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आजूबाजूचे सीसीटीव्ही खंगाळले. फुटेजमध्ये दलाल आणि त्याची मुलगी दिसले. मुलीच्या मोबाईलच्या लोकेशनवरून सगळा ताळा सापडला. रेश्माचा फोन ट्रेस केला असता तो आरा हायवेवर सापडला.

मुंगेर पोलिसांनी तातडीने भोजपूर पोलिसांना अलर्ट केले. हायवेवर नाकाबंदी करून कार पकडली. आत मुलगा सुखरूप होता. पोलिसांनी त्याला लगेच आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात बलबीर सिंग, ड्रायव्हर, 2 महिला, रेश्मा, दलाल आणि त्याची अल्पवयीन मुलगी अशा 7 जणांना अटक झाली. कारमधून 2 लाख 20 हजार रुपयेही जप्त झाले.

आता पोलिसांचा तपास सुरु आहे - हे फक्त एका कुटुंबाचं दुःख होतं का, की रेश्माच्या नावाने चालणारं मुलांच्या विक्रीचं मोठं नेटवर्क आहे ? दुःखावर उपाय शोधताना गुन्हा केला आणि आता संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालं.