गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारूच्या नशेत आणि धान विक्रीच्या पैशावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने डोके ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. रामकला जागेश्वर शिवणकर, वय 44, असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव जागेश्वर आसाराम शिवणकर, वय 48, असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागेश्वर याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो नेहमी पत्नीशी वाद घालायचा. यंदा शेतीत झालेल्या धानापैकी सहा खंडी धान विकले होते. त्याचे पैसे येणे बाकी होते. याच पैशावरून 23 नोव्हेंबरच्या रात्री पती-पत्नीत मोठा वाद झाला. वाद सोडवायला गेलेल्या मुलालाही त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मुलाने कसाबसा वाद शांत केला. त्यानंतर दोघेही झोपायला खोलीत गेले.
24 नोव्हेंबरच्या सकाळी मुलगा आणि नातेवाईक पाणी भरण्यासाठी आईला उठवायला गेले. त्यावेळी आरोपी पतीने दरवाजा उघडला आणि काहीही न बोलता शेताच्या दिशेने पळ काढला. घरात गेल्यावर आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली. बेडखाली रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडली.
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुलाच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.
दारू, पैशाचा वाद आणि रागाच्या भरात घेतलेला टोकाचा निर्णय, यामुळे एक संसार उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.