CRIME NEWS : कफ परेडमधील नेव्ही नगरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना ! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, परिसर हळहळला - टॉप न्यूज मराठी

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. भारतीय नौदलाच्या सरकारी निवासस्थानी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये 34 वर्षीय नाविक पुरनमल शंभूलाल मेहरा, त्याची 28 वर्षीय पत्नी ओमा, 3 वर्षांचा मुलगा यश आणि अवघ्या 2 महिन्यांची मुलगी यांचा समावेश आहे. 

रात्री उघडकीस आले भयंकर सत्य

शनिवार 15 ऑगस्टची रात्र होती. पुरनमलच्या वडिलांनी राजस्थानमधून त्याला अनेकदा फोन केले. पण एकाही कॉलला उत्तर मिळाले नाही. काळजीने त्यांनी थेट नौदलाच्या कंट्रोल रूमला संपर्क केला. त्यानंतर नौदलाचे अधिकारी सरकारी घरात पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसले त्याने सगळ्यांचे पाय जमिनीला खिळले. बेडवर दोन्ही लहान मुले शांतपणे झोपल्यासारखी होती. पत्नी ओमा देखील बेशुद्ध अवस्थेत होती. आणि दुसऱ्या खोलीत पुरनमलचा मृतदेह गळफासाला लटकत होता. तातडीने कफ परेड पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले.

पोलिसांचा तपास आणि कौटुंबिक वादप्राथमिक तपासात समोर आले की पुरनमल यांनी आत्महत्या केली असावी. तर पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा. मात्र घरात विषाची बाटली किंवा सुसाईड नोट सापडलेली नाही. फॉरेन्सिक टीमने संपूर्ण घराची झडती घेतली आहे. पोलिसांच्या चौकशीतून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरनमल आणि ओमा यांच्यात वैवाहिक कारणावरून सतत वाद होत होते. एक आठवड्यापूर्वी ओमाचे वडील तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते. पण मुलांना न सोडण्यावरून वाद झाला होता.

पुरनमलचे मूळ गाव राजस्थान आहे. त्यांचा धाकटा भाऊही नौदलात आहे. तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. पोस्टमार्टम आणि केमिकल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.