CRIME NAGPUR : बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; नागपुरात अल्पवयीन मुलीकडून वडिलांची हत्या - टॉप न्यूज मराठी

नागपूर : नागपुरात अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. स्वतःच्या पोटच्या लेकीवरच दारूच्या नशेत अब्रूवर हात टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर रोजच दारू पिऊन मारहाण आणि शारीरिक, मानसिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीने वडिलांच्या डोक्यात बॅट घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मुली कुठेही सुरक्षित नाहीत, असे आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत. तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते 70 वर्षांच्या महिलेपर्यंत अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पण प्रत्येक लेक तिच्या वडिलांकडे सुरक्षेचा आधार म्हणून पाहत असते. मात्र, याच बापाने लेकीवर वाईट नजर ठेवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर दुखापत झाल्याने जयपाल यांचा मृत्यू झाला. जयपाल रोजच दारू पिऊन घरी येत होते. दारूच्या व्यसनाने त्यांना विळखा घातला होता. रोज घरी आल्यानंतर मुलीला मारहाण करणे आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करणे असे प्रकार सातत्याने घडत होते.

सोमवारी रात्री देखील जयपाल दारूच्या नशेत घरी आले. दारूच्या नशेतच त्यांनी लेकीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वैतागलेल्या अल्पवयीन मुलीने संतापून वडिलांच्या डोक्यात बॅट घातली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.