CM Devendra Fadanvis : "महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन !" 80 व्या स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांचा 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प - टॉप न्यूज मराठी

मुंबई : देशभरात आज 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकला. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची संचलन, पोलीस बँड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " गेल्या 80 वर्षांत भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षांत देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. विकसित भारत म्हणजे फक्त मोठी अर्थव्यवस्था नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणे आहे आणि या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल कारण महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून आज देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत राज्याचा आर्थिक विकासदर 8.8 टक्के राहिला आहे जो अभिमानास्पद आहे. प्रत्येक जिल्हा ग्रोथ इंजिन बनावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि 13 जिल्ह्यांनी त्यांचे लक्ष्य गाठले आहे. "

" शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतून 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची मदत दिली जात असून सध्या 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते. पुढील वर्षभरात 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागात नदीजोड प्रकल्पांद्वारे पाणी पोहोचवून महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. देशात पहिल्यांदा महिला शेतकऱ्यांना अधिकृत दर्जा देणारा कायदा महाराष्ट्रानेच केला असून तरुणांसाठी वर्ल्डक्लास शिक्षणासाठी एज्युसिटी आणि परदेशी विद्यापीठे आणण्यावर भर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले."