CM DEVENDRA FADANAVIS : "दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले !" नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : दिल्लीमध्ये काल 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीने मोठा असंतोष दाखवून दिला. संसदेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी दिल्लीमध्ये संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. गेल्या 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्या होत्या. 

20 दिवस उपोषण सोनम वांगचुक यांनी कठोरतेने केले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत होती. आणि 20 जुलैला त्यांनी संसदेवर मोठ्या मोर्चाची हाक दिली. त्यानंतर दिल्ली पोलीस प्रशासन त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर वातावरण तापतच गेलं. दरम्यान पोलिसांनी रात्रीपासूनच हे आंदोलन आणि संसदेवर जाणारा मोर्चा थोपवण्यासाठी मोठी तयारी केली होती.

एकंदरीत विद्यार्थी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी लाठी चार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर केला. असे दिल्ली पोलीस प्रशासन सांगते आहे. यामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. मारहाण, धक्काबुक्की आणि महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.  दिल्लीत सुरु असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले आहे. त्यामुळे या आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसले आहेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे, हे कुठल्याही परिस्थतीत योग्य नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल,  असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दिल्लीत आंदोलन झाले, त्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक संघटना, ज्यांचं या विषयाशी घेणेदेणे नाही, ते अराजकता निर्माण कशी होईल, त्याचे प्रयत्न करत आहेत.  ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं, दिल्लीत नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली, पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. एक गोष्ट सांगतो, कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं कधीच आवडत नाही. पण काल ज्याप्रकारची अवस्था होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयमही दाखवला आहे. " अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.