CJP Protest : मनोज जरांगे पाटील दिल्लीत दाखल; 'जंतर-मंतरची जागा सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' ! काय म्हणाले जरांगे पाटील - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. विविध सामाजिक संघटना, विरोधी पक्षांचे नेते आणि समाजातील विविध घटक आंदोलनाला पाठिंबा देत असताना, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही आज जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना, "जागा सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," असा ठाम संदेश दिला.

जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शांततेच्या आंदोलनाची ताकद अधोरेखित करत, "शांततेच्या आंदोलनात किती शक्ती असते, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. तुम्ही फक्त जंतर-मंतरची जागा सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, तेच आज विद्यार्थ्यांविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची ताकद आहे, हे त्यांनी विसरू नये. काळात आंदोलनकर्त्यांना कुठेही धक्का लागला, तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. येथे बसलेल्या तरुणांची तळमळ समजून घेतली पाहिजे. कोणत्याही निर्णयामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. जंतर-मंतर हे आंदोलनासाठीचे अधिकृत ठिकाण असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांना तेथून न हटण्याचे आवाहन केले. तसेच, "जर इथे येऊन आंदोलकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधितांना आपल्या गावात आणि जिल्ह्यात फिरणे कठीण होईल," असा थेट इशाराही त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समर्थन व्यक्त केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने केंद्र सरकार यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.