CHHAGAN BHUJBAL : " मला पालकमंत्री करा..!" नाशिकच्या खड्ड्यांवरून केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी स्पष्टच सांगून टाकलं... - टॉप न्यूज मराठी

नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंवरून केलेल्या विधानानंतर निर्माण झालेल्या चर्चेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज खुलासा केला. "माझ्या बोलण्याचा अर्थ मला पालकमंत्री करा असा अजिबात नाही" असे ते म्हणाले.

नाशिकमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 4 ते 5 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या घटनांवर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी "पालकमंत्री गिरीश महाजनांनी याकडे गांभीर्याने पाहावे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही" असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. शहरात "छगन भुजबळांना पालकमंत्री करा" असे बॅनरही लागले होते.

आज माध्यमांशी बोलताना भुजबळांनी या सर्व मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. "नाशिकमध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे मी त्या अनुषंगाने बोललो. याचा अर्थ मी स्वतःसाठी पालकमंत्री पद मागत आहे असा नाही. सध्या जे आहेत त्यांनीच काम चोख करावे, एवढीच अपेक्षा आहे" असे ते म्हणाले. "माझ्या नावाचे फ्लेक्स ज्यांनी लावले होते, त्यांना मी नापसंती कळवली आहे. ते फ्लेक्स काढून टाकण्यासही सांगितले आहे" असेही त्यांनी जोडले.

कुंभमेळा प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी काय आहे, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे आवश्यक आहे. रस्ते खोदून तसेच ठेवल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात वाढतात. याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. 

नाशिकमधून 5-6 मंत्री असूनही जिल्ह्याकडे दुर्लक्ष होते का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. "मी फक्त एवढेच म्हणेन की सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे. नगरसेवक आणि महापौरही या समस्येने त्रस्त आहेत. लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवले पाहिजेत" असे भुजबळ म्हणाले.

यावेळी त्यांनी ओबीसी जनगणनेच्या मागणीवरही भाष्य केले. "ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही आमची जुनी मागणी आहे. ती दुसऱ्या टप्प्यात होईल. विरोधकांनी या मुद्द्याला वाचा फोडणे स्वाभाविक आहे. त्याला माझा विरोध नाही" असे त्यांनी सांगितले.