CHANDRAPUR : चंद्रपूरमध्ये वाघांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघांच्या हल्ल्यात माणसे आणि पाळीव प्राणी मारले जात आहेत. त्यामुळे आता वाघांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदीचा पर्याय समोर आला आहे.
चंद्रपूर वनविभागाने वाघांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. असा प्रस्ताव देणारा चंद्रपूर हा देशातील पहिला जिल्हा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी शेकडो शेतकऱ्यांसह मुल तालुक्यातून चंद्रपूर वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. वाघांच्या हल्ल्यांपासून संरक्षण द्या, शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याचे सांगितले. केंद्राने परवानगी दिल्यानंतरच पुढचा निर्णय होणार आहे. आता केंद्र काय निर्णय घेते, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.