CHAHNDRAKANT PATIL : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोतून प्रवास; मेट्रो सेवेचा वापर करण्याचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी मेट्रोतून प्रवास केला.तसेच, सर्वांनी मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहनही  चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले. 

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी ०८. ३५ वाजता वनाज मेट्रो स्टेशन येथून मेट्रोने प्रवास सुरू केला. ९.०० वाजता ते महात्मा फुले मंडई (बेलबाग चौक) येथे पोहोचले. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोतील प्रवाशांशी संवाद साधला.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता होत असून, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. स्वतः मेट्रोतून प्रवास करत त्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा संदेश दिला.

दरम्यान, यापूर्वीही चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी होत रिक्षातून प्रवास केला होता. यावेळी त्यांनी सपत्नीक पुण्यातील मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे दर्शन घेतले होते.