पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथे उच्चभ्रू सोसायटीत 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव शिल्पा सचिन गवारे असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शिल्पा हिचा मृतदेह सोमवारी रात्री वाकड येथील तिच्या फ्लॅटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. शिल्पाचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिचा पती आयटी इंजिनिअर असून उच्चभ्रू कुटुंबातील आहे. माहेरच्या लोकांनी लग्नात लाखो रुपये खर्च करून 40 तोळे सोने दिले होते तरीही सासरच्या लोकांकडून सतत पैशांसाठी आणि फर्निचर खरेदीसाठी तगादा लावला जात होता. ती नोकरी करत नसल्याने तिला घरातील सर्व कामे करायला लावून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या भावाने वाकड पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पती आणि सासऱ्याला हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली असून सासू, दीर आणि नणंदेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून 3 दिवसात अहवाल मागवला आहे.
गेल्या वर्षी 16 मे रोजी बावधन येथे 26 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लग्नात 51 तोळे सोने, चांदी आणि SUV गाडी दिल्यानंतरही जमीन खरेदीसाठी माहेरून 2 कोटी रुपये आण म्हणून तिचा छळ केला जात होता. तिच्या शरीरावर 30 जखमांचे व्रण आढळले होते. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि पोलिसांनी पती शशांक, सासू, सासरा, दीर, नणंद यांच्यासह 11 जणांवर 1676 पानी आरोपपत्र दाखल केले होते.