भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वेगाने वाढत आहे, परंतु वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक मागे हटतात. अशा ग्राहकांसाठी आता एक मोठी खूशखबर आली आहे. ब्लिंक मोबिलिटी (Blinq Mobility) ने आपली देशातील सर्वात स्वस्त मायक्रो इलेक्ट्रिक कार 'Blinq RYDE' भारतीय बाजारात दाखल केली आहे. या ५-सीटर कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त ४.५० लाख रुपये आहे, ज्यामुळे ती मध्यमवर्गीयांसाठी एक परफेक्ट बजेट कार ठरत आहे. ही कार सोबर ग्रीन, रोसो, मोचा डस्ट, मेटॅलिक यलो आणि लुनर सिल्व्हर यांसारख्या १० आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे
ही छोटी मायक्रो EV ग्राहकांच्या गरजेनुसार दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे. RYDE Family (फॅमिली), ही कार प्रामुख्याने वैयक्तिक किंवा कौटुंबिक वापरासाठी डिझाइन केली आहे. RYDE Fleets (फ्लीट्स) ही कार व्यावसायिक कामांसाठी, जसे की डिलिव्हरी किंवा राइड-हेलिंग व्यवसायासाठी अत्यंत योग्य आहे. (या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ५ लाख रुपयांपर्यंत जाते.)
'Blinq RYDE' चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची ड्रायव्हिंग रेंज. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका पूर्ण चार्जमध्ये तब्बल २५० किलोमीटरपर्यंतची रेंज देते. शहरांतर्गत दैनंदिन प्रवास, ऑफिसला जाणे-येणे आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक वितरणाच्या कामांसाठी ही कार सर्वोत्तम पर्याय ठरेल. या कारमध्ये ग्राहकांसाठी नेहमीच्या होम चार्जिंग आणि DC फास्ट चार्जिंग सोबतच आधुनिक बॅटरी ॲज अ सर्विस मॉडेल देण्यात आले आहे. म्हणजेच, तुम्हाला कार चार्ज करण्यासाठी तासनतास थांबण्याची गरज नाही. कंपनीच्या बॅटरी-स्वॅपिंग प्रणालीमुळे तुम्ही डिस्चार्ज झालेली बॅटरी अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत नवीन चार्ज केलेल्या बॅटरीसोबत बदलू शकता.
सुरक्षेच्या दृष्टीने, या कारच्या बॅटरीला पाणी आणि धुळीपासून पूर्ण संरक्षणासाठी उच्च दर्जाचे IP67 रेटिंग देण्यात आले आहे. कमी बजेटमध्ये प्रीमियम मायक्रो कारचा अनुभव देणारी 'Blinq RYDE' बाजारातील इतर महागड्या इलेक्ट्रिक कार्ससमोर मोठे आव्हान उभे करणार हे निश्चित. पारंपरिक पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत 'Blinq RYDE' चा रनिंग कॉस्ट ६० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे