Birth Anniversary of the Late Ajit Pawar : अजित दादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव जे मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही. अजित दादा राजकारणात मुरलेले तर नक्कीच होते पण सामान्य माणसासाठी कामाचा माणूस यासह त्यांच्या हजरजबाबीपणामुळे देखील ते तेवढेच ओळखले जात होते. जिथल्या तिथे कामाचा एक घाव दोन तुकडे करणारा मराठी माणसांचा कामाचा माणूस तर गेलाच... आठवणीत त्यांनी केलेल्या मिश्किल टिपण्यांचे व्हिडिओ आजही मराठी माणसाला हसवून जातात. आज अजित दादा पवार यांची जयंती, त्यानिमित्ताने थोडक्यात अजितदादांविषयी...
अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील देवद गावी झाला. वडील गोविंदराव उर्फ आप्पा पवार शेतकरी होते आणि काका शरद पवार यांच्या राजकारणामुळे घरात लहानपणापासूनच सार्वजनिक जीवनाचे संस्कार मिळाले.
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बारामतीमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील विद्या भवन कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून B.Com चे शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी ते शेती आणि सहकार क्षेत्रात सक्रिय होते.
दादांचा राजकीय प्रवास तळागाळातून सुरू झाला.
1982 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ते बारामती तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. 1988 मध्ये बारामती अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात नाव कमावले.
1991 मध्ये पहिल्यांदा ते बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 7 वेळा ते आमदार राहिले.
त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना राज्यात मोठी खाती मिळाली. 1992 ते 2025 या काळात त्यांनी ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास आणि अर्थ व नियोजन यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे काम पाहिले.
2010, 2019 आणि 2023 मध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. 2023 मध्ये त्यांनी NDA सोबत जाऊन सरकारमध्ये प्रवेश केला आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
"काम बोलतं" ही त्यांची ओळख होती. बारामती MIDC, मेट्रो, कृष्णा खोरे पाणी योजना यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः सहकार आणि साखर पट्ट्यात त्यांचा मोठा जनाधार होता.
अजित दादा हे कौटुंबिक माणूस म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीच्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्या बारामती हायस्कूलच्या अध्यक्षही आहेत. आज त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत.
त्यांना दोन मुले आहेत. मोठे चिरंजीव पार्थ पवार हे 2019 मध्ये मावळमधून लोकसभा लढले होते आणि सध्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. धाकटे चिरंजीव जय पवार हे खाजगी क्षेत्रात असून कुटुंबासोबत राहतात.
कुटुंबीयांसोबत शेतावर जाणे, सकाळी लवकर कार्यकर्त्यांना भेटणे हा त्यांचा दिनक्रम होता. स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक निर्णयक्षमता यामुळे त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही त्यांना गांभीर्याने घेत होते.
शेवटचा दिवस - 28 जानेवारी 2026
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:10 ला मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या Learjet 45XR विमानात अजित दादा होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला जात होते. बारामती विमानतळावर दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात सकाळी 8:45 च्या सुमारास विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात अजित दादा, त्यांचे सुरक्षा अधिकारी आणि क्रू सदस्यांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला.
या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते आणि राज्यभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला.
अजित दादा पवार यांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना लिहिले आहे की,दादा...
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
66 वर्षांच्या आयुष्यात अजित दादा पवार यांनी सहकारापासून सत्तेच्या शिखरापर्यंतचा प्रवास केला. बारामतीचा विकास हा त्यांचा श्वास होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !