BHIWANDI : फ्लॅटच्या बाल्कनीला लावलेली लोखंडी ग्रील निखळल्याने अपघात; ग्रीलवर बसून खेळत होती दोन मुलं आणि अचानक... - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईतील भिवंडी शहरातील दिवान शाह दर्गा रोड परिसरामध्ये रविवारी उशिरा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका जुनाट चार मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीला लोखंडी ग्रील बसवण्यात आली होती. या ग्रीलवर बसून दोन मुलं खेळत होती. अचानक ही ग्रील निखळली आणि दोन्ही मुलं दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडली आहेत. 

या घटनेने परिसरात आणि कुटुंबीयांमध्ये एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाण-शहा दर्गा रोडवरील हुसेन आर्केड इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शाह यांचे घर आहे. दरम्यान रहमान आणि असद ही दोन मुले गॅलरीच्या खिडकीला बसवलेल्या या लोखंडी ग्रीलवर बसून खेळत होती. अचानक ही लोखंडी ग्रील निखळली आणि थेट या मुलांसह दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. 

या घटनेमध्ये दोन्ही मुलं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही इमारत जुनाट असून अशा इमारतींमध्ये गॅलरीला लावलेल्या लोखंडी जाळ्या खरंच सुरक्षित आहेत का? या अपघातानंतर आता जुनाट इमारती आणि असुरक्षिततेची विविध कारणे यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे.